भोपाळ : वृत्तसंस्था – ‘गुडबाय मित्रांनो, मुख्यमंत्रीजी! माझी तुम्हाला विनंती आहे की, विद्यार्थ्यांना रोजगार द्या. बेरोजगारीमुळे मी आज आत्महत्या करीत आहे. सुशांत सिंह राजपूजप्रमाणे…’असे म्हणत एका बेरोजगार तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कुंदन राजपूत असे असून त्याने इंदूरच्या पीथमपूरमध्ये आत्महत्या केली आहे. तो मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील शेहदखेडी या ठिकाणचा रहिवाशी होता. कुंदनचा व्हिडीओ आणि सुसाइड नोट पोलिसांना भेटली आहे.
कुंदन गेल्या दोन वर्षांपासून सैन्यात भरती होण्याची तयारी करीत होता. यासाठी कुंदर गेली दोन वर्षे उज्जैनमध्ये राहून कोचिंगमध्ये तयारी करत होता. मात्र कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सैन्याची भरती निघाली नाही. यामुळे तो तणावामध्ये होता. 5 जुलै रोजी तो इंदूरच्या पीथमपूर येथील एका कंपनीत नोकरी करण्यासाठी गेला होता. 5 दिवस काम केल्यानंतर 10 जुलै रोजी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सुसाइड नोटमध्ये काय लिहिले होते?
श्रीमान मुख्यमंत्रीजी, तुम्हाला विनंती आहे की, लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करा. बेरोजदारांना रोजगार द्या. आज मी गळफास घेऊन आत्महत्या करीत आहे. दोन वर्षांपासून सैन्यातील भरतीदेखील झालेली नाही, शिवाय माझं वयही उलटून गेलं आहे. मी गेल्या तीन वर्षांपासून उज्जैनमध्ये सैन्य भरतीची तयारी करीत होतो. माझं वय वाढल्यामुळे मी आता भरतीची परीक्षाही देऊ शकत नाही. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी तणावात आहेत. त्यांनी असं पाऊल उचलू नये यासाठी तुम्ही प्रयत्न करा. मी आज त्याच विद्यार्थ्यांसाठी गळफास घेत आहे. माझी विनंती आहे की, माझ्या मृत्यूनंतर माझं पोस्टमार्टम करू नये. माझे कुटुंबीय आणि मुख्यमंत्र्यांना माझं पत्र द्यावे. पोलिसांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मला माझ्या घरापर्यंत पोहोचवावं.
-आपला आज्ञाकारी विद्यार्थी