चक्क ! महामार्गावर पोलिस गाडीलाच उडवून ट्रकसह चालक फरार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | पुणे- बंगलोर महामार्गावर उडतारेनजिक भुईंज पोलिसांच्या वाहनाला ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी पोलीस गाडीत असलेले पोलिस कर्मचारी होते, त्यांना काहीही दुखापत झालेली नसली तरी रस्त्यावर असलेले तीन कामगार गाडीखाली सापडून जखमी झाले. या अपघातात ट्रकसह चालकाने पलायन केले असून त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. धनसिंग लालू राठोड (वय ४५, रा.उडतारे), विजू भिमू पवार (वय- 50, रा.उडतारे), दत्तात्रय बाबुराव मुळे (वय ५५, रा.उडतारे) अशी जखमींची नावे आहेत. महामार्गावर पोलिस गाडीलाच उडवून ट्रकसह चालक फरार झाला असून अद्याप शोधमोहिम सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महामार्गावर उडतारे गावानजीक डिव्हायडरची दुरूस्ती करण्याचे काम सुरू होते. येथील कामगारांच्या सुरक्षेसाठी पोलिस कार्यरत होते. भुईंज पोलिसांच्या वाहनाला (क्र.एम. एच. 11 डीए- 6351) पाठीमागून येणाऱ्या अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे गाडी डिव्हाडरवर पलटी झाली. यावेळी तेथे काम करणारे तीन कामगार गाडी खाली सापडले. प्रसंगावधान राखत भुईंज पोलिस गाडीत असलेले पोलिस हवालदार दत्तात्रय धायगुडे, हवालदार शिवाजी तोडरमल आणि चालक संजय वाघ यांनी तातडीने मदतकार्य करून जखमींना बाहेर काढून उपचारासाठी भुईज प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.

दरम्यान, पोलिस गाडीला ठोकर देवून पळून जाणाऱ्या ट्रकबार रात्री उशीरापर्यंत तपास सुरू होता. वरील घटनेची नोंद भुईंज पोलिस स्टेशनमध्ये झाली असून अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांची टीम करीत आहे. भुईंज पोलिस स्टेशनचे हवालदार दत्तात्रय धायगुडे व चालक संजय वाघ हे महामार्गावर कामगारांना सुरक्षेबाबत सुचना देताना ते गाडी बाहेर डिव्हाडरवर होते. त्यामुळे ते या अपघातातून सुदैवाने वाचले. अपघातात नुकसानग्रस्त झालेली पोलीस गाडी एकच महिन्यापूर्वी भुईंज पोलिस ताफ्यात दाखल झाली होती.

Leave a Comment