हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण पाळीव प्राण्यांना खायला अन्न देतो. मात्र, त्या अन्नातून कोणत्याही स्वरूपाचा प्लॅस्टिकची पिशवी, धातू जाऊ नये याची काळजीही घेतो. मात्र, तरीही नजरचुकीने ते काही पदार्थ खातातच. असाच एक प्रकार उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिरसी तालुक्याच्या हिपनहल्ली या गावात घडला आहे. या ठिकाणी गाईचे पूजन करत असताना नेवेद्य त्या गाईला देण्यात आला. यावेळी तिच्या अंगावर सोन्याचे दागिनेही घालण्यात आले होते. मात्र, त्या गाईने नेवेद्याबरोबर तोंडात ठेवलेला दागिनाही खाल्ला. अखेर तो दागिना परत मिळवण्यासाठी कुटूंबातील लोकांना तब्बल महिनाभर वाट पहावी लागली. अखेर कुटूंबातील सदस्यांनी डॉक्टरांना बोलवून गाईचे ऑपरेशन करून दागिना मिळवला.
याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिरसी तालुक्याच्या हिपनहल्ली या गावात अनेक अनोख्या पद्धतीने गायीची मनोभावे पुजा केली जाते. या ठिकाणी गाईचे पूजन करण्यापूर्वी तिला हार आणि रंगीबेरंगी फुलांनी सजवले जाते. या ठिकाणी गाईला काही लोक गायीला लक्ष्मीचे रूपही मानतात. म्हणून येथील एका कुटूंबातील लोकांनी घरातील गाईला सोन्याचे दागिने घालून सजवले. गाईला सजवल्यानंतर तिची मनोभावे पूजा अर्चाही केली.
गाईची पूजा केल्यानंतर तिला चांगले पदार्थ खाऊ घातला. यावेळी तिच्या तोंडात सोन्याचा दागिना ठेवून परत करत असतानाच अचानक तो गाईने गिळला. या प्रकारानंतर कुटूंबातील लोकांची एकच तारांबळ उडाली. जो तो त्या गाईच्या तोंडातून दागिना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागला. मात्र, काही केल्या त्यांची 20 ग्रॅमची सोन्याची चैन काही मिळाली नाही. अखेर त्या कुटूंबाने ड्रंरोज गाईच्या शेणातून ती चैन बाहेर पडली का हे पाहायला सुरुवात केली. असे तब्बल तीस ते पस्तीस दिवस प्रकार केला गेला. मात्र, काही केल्या चैन बाहेर पडेना असे दिसताच कुटूंबातील सदस्यांनी पशु वैद्यकीय डॉक्टरांची मदत घेतली. डॉक्टरांनी गायीवर शस्त्रक्रिया करून केले असता ते 20 ग्रॅम ऐवजी फक्त 18 ग्रॅम निघाले.