सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके
प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्राची बाजारपेठ असलेल्या पाचगणी येथील बाजारपेठ कोरोनाच्या निर्बंधांमुळे अद्यापही ‘ लॉकच‘ आहे. राज्य सरकारने काही ठिकाणच्या बाजारपेठांचा उघडण्याची परवानगी दिली आहे. मात्र, पाचगणी येथील बाजारपेठ अद्यापही बंदच ठेवण्यात येत असल्यामुळे हि बाजारपेठ ‘अनलॉक’ केव्हा होणार?, असा प्रश्न पाचगणी येथील व्यापारी व नागरिकांतून विचारला जात आहे.
कोरोना संकटाने गेले वर्षभरापासून व्यापाऱ्यांचा आपली दुकाने सुरु आणि बंद ठेवण्याचा खेळ चालू आहे. अनेकवेळा बाजारपेठा बंद ठेवण्यात येत असल्यामुळे व्यवसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार दुकाने बंद ठेवावी लागत असल्यामुळे पाचगणीतील व्यापाऱ्यांची अवस्था ‘ आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना ‘ अशी झाली आहे. या परिस्थितीला सुरळीत करण्यासाठी कोण पुढे येणार का? असा प्रश्न व्यापाऱ्यांतून विचारला जातो आहे.
पाचगणी ही बाजारपेठ पर्यटक तसेच परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असून कोरोना संसर्गापासून या बाजारपेठेची रया गेली आहे. येथील अनेक व्यापारी हे स्थानिक नागरिक आहेत. दुकाने बंद ठेवावी लागत असल्याने त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने अध्यापहि बंदच आहेत. त्यामुळे इतर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांची अवस्था बिकट झाली आहे. दुकानांची भाडीपट्टी, वीज बिल, पाणी बीले, मुलांचे शिक्षण हा सर्व खर्च दुकाने बंद असल्यामुळे कसा भागवणार? याची चिंता व्यावसायिकांना लागून राहिली आहे. प्रशासनाने कोरोनाबाबत काही निर्बंध टाकून ही बाजारपेठ खुली करावी, अशी मागणी या व्यापारी वर्गाकडून होत आहे.