Wednesday, October 5, 2022

Buy now

शेतकऱ्याचा ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये सापडून जागीच मृत्यू

कराड | वाघेरी (ता. कराड) येथील हलगी नावाच्या शिवारात ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये सापडून शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. दादा अब्दुल पटेल (वय- 55, रा. वाघेरी, ता. कराड) असे ठार झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, वाघेरी येथील पटेल कुटूंबियांची हलग्या नावच्या शिवारात शेतजमिन आहे. या शेती क्षेत्रातील ऊसाची तोड झाली असून पाचट जाळल्यानंतर रविवारी शेतीत रोटावेटर मारण्याचे काम सुरू होते. दादा पटेल त्याठिकाणी उपस्थित होते. तर त्यांचा पुतण्या ट्रॅक्टर चालवित होता. रोटावेटर जमिनीला घासून जात नसल्यामुळे दादा रोटावेटरवर उभे राहिले. मात्र, अचानक तोल जाऊन ते ट्रॅक्टरखाली रोटावेटरसमोर पडले. त्यामुळे त्यांच्या अंगावरुन रोटावेटर जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीही त्याठिकाणी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते. याबाबतची नोंद पोलिसात झाली नव्हती.