औरंगाबाद – मुलीच्या विवाहानंतर दोनच दिवसांत पित्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. वाळूज परिसरातील साजापूर येथील ही घटना काल उघडकीस आली.
साजापूर येथील समीर चांद शहा (40) यांच्या मुलीचा शुक्रवारी साजापूर येथे विवाह झाला होता. त्यानंतर ढोरकीन येथे मुलीच्या सासरी रविवारी स्वागत समारंभ असल्याने समीर हे परिवारासह ढोरकीन येथे गेले होते. तेथून परतल्यानंतर समीर हे संपर्कात नव्हते. दरम्यान, काल समीर यांचा मृतदेह साजापूर येथील तलावात तरंगत असल्याचे काही नागरिकांना दिसले. त्यातील एकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करून समीर यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी समीर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला. मात्र, समीर यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.