सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
भुईज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने सन 2022-23 मध्ये गळीताकरिता आलेल्या ऊसास प्रतिटन 2 हजार 600 रूपये पहिला हप्ता केला होता. पहिल्या पंधरवड्याचे बील 15 कोटी 25 लाख 82 हजार 539 रूपये संबंधित सभासद, बिगर सभासद शेतकऱ्यांच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर मंगळवारी (दि. 17) जमा करण्यात आली असल्याची माहिती, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, किसन वीर कारखान्याचा गळित हंगामास सुरूवात 15 नोव्हेंबरला झालेली होती. त्यावेळी कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद आबा पाटील यांनी सभासद शेतकऱ्यांना शब्द दिलेला होता कि, कारखान्याच्या मागील व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचा किसनवीर वर विश्वास राहिलेला नव्हता. परंतु आम्ही या सर्व अडचणींवर मात करीत कारखान्यास गतवैभव मिळवून देणार आहोत. आज किसन वीरचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करीत असल्याने कारखान्यावर पुन्हा एकदा विश्वास निर्माण झालेला आहे. गळित हंगामच्या शेवटी जी रिकव्हरी असेल त्यानुसारच किसन वीरचा अंतिम दर राहणार आहे.
किसन वीरच्या पहिल्या पंधरवड्यात (दि. 16/11/22 ते 30/11/22) कारखान्याकडे 58 हजार 685 मेट्रिक टनाचे गाळप झालेले होते. पहिला हप्ता 2 हजार 600 रूपयांप्रमाणे 15 कोटी 25 लाख 82 हजार 539 रूपयांची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता. आपला संपुर्ण ऊस हा किसन वीर कारखान्यालाच घालावा, असे आवाहनही चेअरमन आमदार मकरंद आबा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन नितिन काका पाटील, उपाध्यक्ष प्रमोद शिंदे व संचालक मंडळाने केले आहे.




