सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा वन विभागाच्या भरारी पथकाने पुणे बेंगलोर महामार्गावर खैर प्रजातीच्या सोलीव लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. तसेच ते दोन ट्रक ताब्यात घेऊन तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, सोलीव लाकडाची तस्करी करणारी ट्रक चिपळूणच्या दिशेने जाणार असल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली होती. या माहितीच्या अनुषंगाने पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वन विभागाचे भरारी पथक रात्रग्रस्त करत असताना अतीत गावच्या हद्दीत दोन ट्रक पकडून त्यांची तपासणी केली. या तपासणीत पोलिस पथकाला खैर प्रजातीचा सुमारे वीस लाख रुपये किमतीचा सोलीव लाकूड माल मिळून आला.
अवेळी केलेल्या अधिक चौकशीमध्ये संबंधित लाकूड माल अवैधरित्या चोरटी वाहतूक केली जात असल्याचे समजले. याप्रकरणी वनविभागाने दोन्ही ट्रकसह सुमारे 20 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील ट्रकचालक शेषनाथ जयस्वाल {रा. उत्तरप्रदेश) आणि मोहम्मद खान (रा. गुजरात) यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.