सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
किल्ले सज्जनगडावर गेल्या चार वर्षांपूर्वी पहिल्या महाद्वारानजीक असलेल्या बुरुजाचा काही भाग अतिवृष्टीमध्ये ढासळला होता. तर आता समर्थ महाद्वाराच्या वरील बाजूस असलेल्या पायरी मार्गावरील तटबंदीचा भाग ढासळला आहे. किल्ले सज्जनगडावर प्रशासनाने गडावरील दोन्ही संस्थांनी मिळून या ढासळलेल्या तटबंदीची दुरुस्ती तत्काळ करावी, अशी मागणी दुर्गप्रेमी व समर्थ भक्तांमधून होत आहे.
परळी खोऱ्यातील इतिहासाची साक्ष असलेला किल्ले सज्जनगड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून गडावर चांगलाच पाऊस झाल्याने पावसाचे पाणी तटामध्ये मुरून तटबंदी पडली आहे. सज्जनगडावर बुरुज तटबंदी पायरी मार्ग यांचे जतन होणे गरजेचे आहे. सज्जनगड संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले पाहिजे.
सज्जनगड येथे भाविकांची मोठी गर्दी असते. दररोज येणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तटबंदी मजबूत करणे गरजेचे आहे. अन्यथा भाविकांना त्याचा त्रास होवू शकतो. पावसाने उघडीप दिल्याने तात्काळ कोसळलेले बुरूजांची दुरूस्ती करणे गरजेचे आहे, कारण पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा हवामान खात्याने इशारा दिला आहे.