वडूज | पोलिस अधिकारी असल्याचे सांगून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कागदपत्रे तपासणी करणाऱ्या एकास वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले. नीलेश सुरेश चव्हाण (रा. वडगाव हवेली, ता. कराड) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार बापू शिंदे यांनी खबरी जबाब दिला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडूज- कऱ्हाड रस्त्यावर हॉटेल ब्ल्यू डायमंडसमोर पाच वाजण्याच्या सुमारास पोलिस अधिकाऱ्याच्या वेशातील एक अज्ञात व्यक्ती वाहने अडवून त्यांच्या चालकांची कागदपत्रे तपासत असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांना मिळाली. त्यानुसार पालेकर, पोलिस नाईक दीपक देवकर, संदीप शेडगे, दऱ्याबा नरळे, श्री. सूर्यवंशी यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता. व्यक्ती त्याची दुचाकी (एमएम- 11 एसी- 5426) रस्त्याकडेला लावून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना थांबण्याचा इशारा करीत असल्याचे दिसून आले. त्या वेळी त्याच्याकडे जाऊन पोलिसांनी चौकशी केली असता. आपण सहायक पोलिस निरीक्षक विशाल संजय पाटील असे नाव असल्याचे सांगितले.
आपण कोठे नेमणुकीस आहात, असे पोलिसांनी विचारताच तो चाचपडला. पोलिसांनी त्यास ओळखपत्राची मागणी केली. त्या वेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यास पाठलाग करून पकडले. त्याची अधिक चौकशी करता त्याने आपले नाव नीलेश सुरेश चव्हाण (रा. वडगाव हवेली) असे असल्याचे सांगितले. तसेच आपण कोठेही पोलिस खात्यात सेवेत नसल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी संबंधितास ताब्यात घेतले. अधिक तपास महिला पोलिस नाईक अश्विनी काळभोर करीत आहेत.