आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी हिवाळी अधिवेशनापर्यंत चालणार; नार्वेकरांकडून दिरंगाई?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 25 सप्टेंबर रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदारांच्या अपात्र प्रकरणाची सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीमध्ये पुढील सुनावणीच्या वेळापत्रकाविषयी चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता आमदार अपात्र प्रकरणाच्या पुढील सुनावणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार, या प्रकरणाची सुनावणी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सुरू राहणार आहे. तर 13 ऑक्टोंबरपासून पुढील सुनावणीला सुरुवात होणार आहे.

शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी ही 13 ऑक्टोंबरपासून सुरू होऊन ती 23 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. परंतु निर्णयाच्या दिशेने नेणारी उलट तपासणी 13 नोव्हेंबर नंतर सुरू करण्यात येणार आहे. या सुनावणी संदर्भात जाहीर झालेले वेळापत्रक शिवसेनेच्या दोन्ही गटांना पाठवण्यात आले आहे. हे वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयासमोर महान्याय अभिकर्ता तुषार मेहता सादर करणार आहेत. मुख्य म्हणजे, सुनावणीचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून ठाकरे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा अध्यक्ष हे मुद्दामून या सुनावणीला उशीर लावत आहेत अशी टीका ठाकरे गटाच्या आमदारांकडून करण्यात येत आहे.

परंतु, “आता याचिकांवरील सुनावणी करताना कोणत्याही प्रकारची दिरंगाई केली जाणार नाही. परंतु कोणत्याही प्रकारची घाईही केली जाणार नाही. ज्यामुळे अन्याय होईल. अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे. न्यायालयानेही योग्य ती सूचना दिली आहे. न्यायालयाचा मान राखला जाईल. अध्यक्षांचीही बाजू न्यायालयात मांडली जाईल” असे राहुल नार्वेकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता या सुनावणी दरम्यान राजकीय वर्तुळात नक्की काय घडामोडी पाहायला मिळतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सुनावणीचे वेळापत्रक

13 ऑक्टोंबर – सर्व याचिकांवर एकत्र करायच्या की नाही यावर सुनावणी. ठाकरे गटाचा युक्तिवाद.
13 ते 20 ऑक्टोंबर – दाखल कागदपत्रांची आणि आदेशांची पाहणी करण्यासाठी तसेच कागदपत्र शोधण्यासाठी दोन्ही गटातील वकिलांना संधी.
20 ऑक्टोंबर – अपात्रेबाबत सर्व याचिकांची सुनावणी एकत्र व्हावी की नाही यावर राहुल नार्वेकर यांचा निर्णय जाहीर करणार.
27 ऑक्टोंबर – दाखल का कागदपत्रांपैकी कोणते कागदपत्रे स्वीकारायचे कोणते नाकारायची यावर दोन्ही पक्ष मत मांडणार.
6 नोव्हेंबर – अपात्रेबाबत निर्णय यावर दोन्ही पक्ष आपले मत लेखी सादर करून त्यांच्या प्रति एकमेकांना देतील.
10 नोव्हेंबर – अपात्रतेबाबत मुद्दे सादर करत राहुल नार्वेकर दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकतील.
20 नोव्हेंबर – दोन्ही गटांकडून त्यांच्या साक्षीदारांची यादी व प्रतिज्ञापत्र दाखल करतील आणि एकमेकांना लेखी स्वरूपात देतील.
23 नोव्हेंबर – उलटतपासणी सुरू होईल आवश्यकतेनुसार दोन्ही गटाच्या वकिलांना सोयीनुसार तारखा देण्यात येतील. उलट तपासणी आठवड्यातून दोनदा होईल.
अंतिम युक्तिवाद – सुनावणीचे सर्व प्रक्रिया संपल्यानंतर दोन आठवड्यानंतर अंतिम सुनावणीसाठी तारीख जाहीर होईल.