हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अवघ्या काही दिवसांवर राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा आला आहे. या सोहळ्यानिमित्त हाय कोर्ट आणि जिल्हा कोर्ट यांना 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्याची मागणी बार काऊंसिल ऑफ इंडियाने केली आहे. या संबंधित पत्र त्यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना पाठविले आहे. त्यामुळे आता या मागणी बाबत सरन्यायाधीश काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
बार काऊंसिल ऑफ इंडियाने सरन्यायाधीशांना पत्र लिहीत 22 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त सुट्टी देण्याची मागणी केली आहे. आपल्या पत्रामध्ये बार काऊंसिल ऑफ इंडियाने म्हटले आहे, “22 जानेवारी रोजी राम मंदिराचा भव्य असा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यानिमित्त सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट आणि जिल्हा सत्र कोर्ट यांना सुट्टी जाहीर करण्यात यावी.”
त्याचबरोबर या पत्रामध्ये म्हटले गेले आहे की, अधिवक्ता आणि न्यायालयातील सर्व कर्मचाऱ्यांना अयोध्या आणि देशांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी. या मागणीसंदर्भात आता सुनावणी पुढच्या दिवशी किंवा विशेष व्यवस्थेद्वारे होऊ शकते. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणासाठी लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नये, सरन्यायाधीशांनी यासंदर्भात योग्य निर्णय घ्यावा.
मुख्य म्हणजे या मागणी संदर्भात आता सरन्यायाधीश काय निर्णय घेतील? किंवा ते प्रत्यक्षात सुट्टी जाहीर करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त 16 जानेवारीपासूनच देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अयोध्येमध्ये देखील विविध पूजा विधी पार पडणार आहेत. त्यानंतरच 22 जानेवारी रोजी राम लल्लाची मूर्ती गर्भगृहात स्थापित करण्यात येईल.