हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही मुले ही खूप कमी वयात प्रौढ होतात. त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती त्यांना तशी बनविते. समोर कितीही मोहाचे क्षण आले तरी ते झुगारून देऊन केवळ एखाद्या ध्येयाने ही मुले पेटून उठलेली असतात. जिथे तिथे ते स्वप्न जणू त्यांचा पाठलाग करत असतं. अक्षय गडलिंगची या तरुणाची कथा देखील अशीच काहीशी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच लागलेल्या निकालात तो नायब तहसीलदार झाला आहे. पण मोठ्या क्लासेस मध्ये जाऊन, सर्व गोष्टी वेळच्या वेळी जिथल्या तिथे मिळून त्याने हे यश मिळविले नाही तर या यशासाठी संघर्षाचा कठीण रस्ता त्याने तुडवला आहे. तेव्हा कुठे आज नायब तहसीलदार म्हणून अवघ्या वयाच्या २५ व्या वर्षी आपल्या मातापित्यांची मान त्याने उंचावली आहे.
अक्षय गडलिंगची हा अमरावती जिल्ह्यातील तिवसा या गावचा तरुण होय. वडील बाबाराव गडलिंगची गेली ४० वर्षे भंगार वेचण्याचे तसेच रांगोळी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. तिवसा येथे एका झोपडपट्टीत त्यांचे कुटुंब राहते. पण आपल्या परिस्थितीचे भांडवल न करता जिद्दीने अक्षयने कष्टाचा रस्ता निवडला. शाळेत असल्यापासूनच वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमधून श्रोत्यांची मने जिंकता जिंकता तो यशाचे शब्द वेचू लागला. आणि त्याच जमापुंजीतून आज अधिकारी होण्याच्या स्वप्नाला त्याने गवसणी घातली आहे. कित्येकदा परिस्थिती आडवी आली. अनेक अडचणी आल्या पण त्याला न जुमानता प्रयत्न आणि कष्ट त्याने कधीच सोडले नाहीत आणि अवघ्या २५ व्या वर्षी नायब तहसीलदार हे पद त्याला मिळाले.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तो बरेच दिवस करतो आहे. त्याची पीएसआय तसेच वन विभागासाठी देखील निवड झाली होती. मात्र काही कारणास्तव तो तिथे जाऊ शकला नाही. आज तो नायब तहसीलदार झाला आहे. आणि जिद्द असेल तर काहीही करता येऊ शकते याचे आणखी एक उदाहरण त्याने इतरांसाठी घालून दिले आहे. त्याच्या या यशाचे कौतुक आणखी एका कारणासाठी आहे ते म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठीच्या कोणत्याच क्लासला न जाता केवळ वाचनालयातील अभ्यासाच्या जोरावर त्याने हे यश खेचून आणले आहे. परिस्थितीसमोर झुकण्यापेक्षा परिस्थितीला झुकवण्यात खरे यश असल्याचे पुन्हा एकदा त्याने सिद्ध केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.