औरंगाबाद – नवरा चारित्र्यावर संशय घेतो. अडीच वर्षाच्या मुलीला स्वतःकडे ठेवून नवऱ्याने पत्नीला जाधववाडी येथील माहेरी घरी नेऊन सोडले. माहेरी वडील वारलेले. त्यात नवऱ्याचा आधीचा त्रास सहन करू शकत नसल्यामुळे हर्सूल तलावात आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणीला दामिनी पथकाने मदतीचा हात दिल्यामुळे तरुणीचा जीव वाचला, हा प्रकार काल घडला.
जाधववाडी येथील एम एस्सी झालेल्या 26 वर्षीय तरुणीचा विवाह एका युवक व सोबत झाला होता. या दोघांना एक मुलगी झाली. त्यानंतर तो सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. तरुणी एका कंपनीत नोकरीही करते. नवऱ्याने अडीच वर्षाच्या मुलीला स्वतःकडे ठेवून तिला संशयावरून माहेरी नेऊन सोडले. त्यामुळे तणावातून तिने हर्सूल तलावात आत्महत्या करण्याचा निर्णय रविवारी घेतला. ती तलावावर गेली. मात्र सुरक्षारक्षकांना संशय आल्यामुळे त्यांनी तिला अडवून दामिनी पथकाला फोन केला. त्यानंतर फौजदार सुवर्णा उमाप यांनी पोलीस अंमलदार लता जाधव, मनीषा बनसोडे यांना घटनास्थळी पाठवले.
रागाच्या भरात आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या विवाहितेला आपण कोणता निर्णय घेतला याची उपरती समुपदेशननंतर आली. त्यानंतर तिने जीव वाचवल्याबद्दल दामिनी पथकासह हर्सूल तलाव परिसरातील सुरक्षारक्षकांच्या आभार मानत आई व भावासोबत माहेर गाठले.