राम मंदिर भूमिपूजनासाठी गैर हिंदूंना बोलावू नका! हिंदू महासभेची रक्तानं पत्र लिहून अमित शहांकडे मागणी

नवी दिल्ली । अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनासाठी गैर हिंदूंना बोलावण्यात येऊ नये, अशी मागणी हिंदू महासभेकडून करण्यात आली. यासाठी या संस्थेच्या एका सदस्यांनं चक्क रक्तानं पत्र लिहून गृहमंत्री अमित शहांना धाडलं आहे. बुधवारी ५ ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. यासाठी १७५ मान्यवरांना सोहळ्यात आमंत्रित करण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे. यात पहिलं आमंत्रण अयोध्या खटल्यातील मुस्लीम पक्षकार इक्बाल अन्सारी यांना धाडण्यात आलंय. तसंच जवळपास १० हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडेय यांनी गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र धाडलंय. जीटी रोड स्थित कार्यालयात कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांनी हे पत्र चक्क रक्तानं लिहिलंय. भूमिपूजनात सहभागी होणाऱ्या गैर हिंदू व्यक्तींना अशा शुभप्रसंगी प्रवेश दिला जाऊ नये, अशी मागणी हिंदू महासभेनं केलीय. रक्तानं पत्र लिहून हिंदू महासभेनं गृहमंत्र्यांकडे ही मागणी केलीय. राम जन्मभूमी हे एक धार्मिक स्थळ आहे. कोणतंही ‘धर्मनिरपेक्ष’ कार्यालय नाही, असंही हिंदू महासभेनं म्हटलं आहे.

याशिवाय, हिंदू महासभेचे वकील हरी शंकर जैन आणि इतर वकील भक्तांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी जन्मस्थळावर कोणत्याही मुस्लीम किंवा गैर हिंदू व्यक्तीला बोलावण्यात येऊ नये, अशी मागणी केलीय. जर बोलावण्यात आलं तर कायदेशीर कारवाई करण्याचीही धमकी या पत्रात देण्यात आलीय. ‘मक्का मदिन्यात हिंदुंना प्रवेश निषेध आहे मग राम मंदिरात मुस्लिमांना कसा प्रवेश दिला जाऊ शकतो?’ असं त्यांचं म्हणणं आहे.

कोण आहे पूजा शकून पांडेय?
हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडेय महात्मा गांधींच्या पुतळ्यावर तीन गोळ्या झाडून चर्चेत आल्या होत्या. यावेळी, पुतळ्यावर पेट्रोल टाकून मिठाई वाटप करताना हिंदू महासभेच्या सदस्यांनी ‘गोडसे झिंदाबाद’चे नारेही दिले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like