Wednesday, February 1, 2023

राज्यातील शिक्षकांचे होणार त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने विशेष प्रशिक्षण

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। प्राथमिक शिक्षकांच्या सेवेमध्ये प्राथमिक शिक्षकांना बारा वर्षानंतर वरिष्ठ श्रेणीचा लाभ मिळतो. सलग एकाच पदावर सेवा असेल तर आणि सलग एकाच पदावर २४ वर्षे उपशिक्षक म्हणू काम केल्यानंतर निवड श्रेणीचा लाभ शासनाला देणे बंधनकारक आहे. त्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण होणे गरजेचे असते. त्यामुळे राज्यातील पदवीधर तसेच उपशिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे अंतर्गत त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र शासनाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकात म्हंटले आहे कि, या प्रशिक्षणाचा लाभ देण्यासाठी करण्यात येणाऱ्या निवड श्रेणीचे महत्वाचे सहा ठळक निकष लावण्यात आलेले आहेत. त्यामध्ये संबंधित प्रशिक्षणार्थीने एकाच वेतन श्रेणीमध्ये चोवीस वर्षे सेवा पूर्ण असावी, उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेली असावी, बी पी एड धारकांनी एम पी एड ही व्यावसायिक अर्हता प्राप्त केलेली असावी. अथवा बी एस्सी बी एड पदवी घेतलेल्यानी एम एस्सी बी एड किंवा बी एस्सी एम एड ही शैक्षणिकअर्हता धारण केलेली असावी.

- Advertisement -

विद्यालयातील किंवा संस्थेतील त्या एकाच वेतन श्रेणीतील वरिष्ठ श्रेणी प्राप्त केलेल्या एकूण शिक्षकांपैकी 20 टक्के शिक्षकांना घालून दिलेल्या अटीच्या अधीन राहून निवड श्रेणी मंजूर करता येते.त्यासाठी शिक्षक सेवाजेष्ठता विचारात घेतली जाईल. शासनाने आवश्यक ठरविलेले सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे, सन 2017 पूर्वीच निवडश्रेणी देय असेल तर त्याने आवश्यक सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केले नसल्यास त्याचे दोन वर्षांचे गोपनीय अहवाल समाधानकारक असल्यास ते गृहीत धरावेत.

राज्य सरकारकडून पारित करण्यात आलेल्या शासन निर्णयात म्हंटले आहे कि, संबंधित प्रशिक्षणार्थीने किमान तीन आठवड्यांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासाचे (Online) सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत दहा दिवसांच्या ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रण करण्यात येईल.

वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक प्रशिक्षण शासन स्तरावरून आयोजित न केल्यामुळे वरिष्ठ व निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत सदर दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना वरिष्ठ/निवड श्रेणीसाठी पात्र दिनांकापासून लाभ देय राहील. ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सेवानिवृत्त होणा-या अथवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र असणा-या शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या अटींमधून सवलत देण्यात येत आहे.