चोरी करण्यासाठी नामी शक्कल ! लेडीज गाऊन घालून करत होता चोरी

Thief
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरात चोरीचा एक नवीनच प्रकार समोर आला आहे. चोरट्याने नागरिकांची बंद घरे फोडण्यासाठी नवीनच शक्कल लढवली आहे. हा चोरटा चक्क महिलांचे गाऊन आणि स्वेटर घालून घरफोड्या करत होता, एखादे घर बंद दिसताच ते भरदिवसा फोडून दागिने आणि रोकड लंपास करायचा, ही माहिती त्याला बेड्या ठोकल्यानंतर पोलिस तपासात समोर आली आहे. नईम उर्फ चुन्नू उस्मान शहा (३७, रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड) असे या चोरटी घरफोड्याचे नाव असून त्याला दोन बायका आणि सात मुले आहेत.

नऊ ते दहा महिन्यापूर्वी या चोरट्याने रवींद्रकुमार रामसुंदर सेठी (५४, रा. एन-१, सिडको) यांचे घर फोडले होते. तेव्हा त्याने त्यांच्या घरातून लाखो रुपयांचे दागिने लांबवले. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी वकिल खलील अहमद गुलाम (५५, रा. गरवारे स्टेडीयमजवळ, एन-१, सिडको) यांचे घर फोडून रोख, दागिने लांबवले होते. या घटना ताज्या असताना पतीवर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरु असल्यामुळे तिथे गेलेल्या कडूबाई बालाजी चाथे (४५, रा. म्हसोबानगर, हर्सूल) यांचे मध्यरात्री घर फोडून दागिने आणि रोख असा दीड लाखांचा ऐवज लांबवला. या घटनांच्या अनुषंगाने गुन्हे शाखेने तांत्रिक पध्दतीने तपास सुरु केला.

तेव्हा नईमने घरफोड्या केल्याचे समोर आले. त्यावरुन गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके, सहायक फौजदार नंदकुमार भंडारे, किरण गावंडे, संजयसिंह राजपूत, ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, अश्विन होनराव यांनी घरफोडीचे तिन्ही गुन्हे उघडकीस आणले. सध्या नईमला एमआयडीसी सिडको पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.