सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील हद्दीत पाडेगाव टोलनाका येथे अनोळखी भामट्यांनी घरी सोडण्याचा बहाणा करून रोख रक्कम व मोबाईल फोन चोरल्याची घटना घडली होती. त्यातील आरोपींना लोणंद पोलीसांना मुद्देमालासह अटक करण्यात यश मिळवले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील निरा येथील संजय किसन काशिद यांना पाडेगाव टोलनाक्यावर दोन अनोळखी भामट्यांनी घरी सोडण्याचा बहाणा करून मोबाईल व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली होती. त्यानंतर या घटनेची फिर्याद संजय काशिद यांनी दि. 1 ऑगस्ट रोजी लोणंद पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या गुन्हयाबाबत प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास सुचना दिल्या.
त्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेत गुन्हयातील आरोपी राहुल विजय चौगुले (वय 29, रा. शनिवारपेठ, कराड) यास कराड येथून ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्यास तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली केली आहे. तर या गुन्ह्यातील दुसरा आरोपी महवीर संजय जाधव (वय 19, रा. लोणंद) यास लोणंद येथुन ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हयातील चोरीस गेला 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन व अडीच हजार रुपयर रक्कम आरोपींकडुन हस्तगत करण्यात आली आहे.
पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल वायकर, पोलीस उप- निरिक्षक गणेश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस नाईक संतोष नाळे, श्रीनाथ कदम, अभिजित घनवट, शौकत शिकलगार, अविनाश नलवडे, विठ्ठल काळे, फैय्याज शेख, अविनाश शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. गुन्हयाचा तपास पोलीस नाईक संतोष नाळे हे करीत आहेत.




