हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पंढरपुरात कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. विशेष बाब म्हणजे, यावर्षी कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहपत्नी अमृता फडणवीस यांना मिळाला आहे. त्यामुळे आज पहाटे फडणवीस दांपत्याने स्वहस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. तसेच, मानाचे वारकरी म्हणून नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना देखील विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेचा मान देण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल – रुक्मिणीची महापूजा करण्याचा मान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीला देण्यात येतो. यावर्षी देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असल्यामुळे हा मान त्यांना देण्यात आला आहे. यासाठी बुधवारीच फडणवीस दाम्पत्य पंढरपूरात दाखल झाले होते. यानंतर आज पहाटे विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालून देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली. या दोघांबरोबर, बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांनी देखील विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली.
पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान ।
आणिक दर्शन विठोबाचे॥अदभूत, आनंदी, अविस्मरणीय पहाट..
सौभाग्य… विठ्ठलाची कृपा !
कार्तिकी एकादशीनिमित्त आज पुन्हा एकदा पंढरपूर येथे श्री विठुराया आणि रखुमाईची सपत्नीक शासकीय पूजा करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.
श्री विठ्ठलाची कृपा सदैव… pic.twitter.com/Gcx3en9p4o— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 23, 2023
दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यामुळे पुढारी नेत्यांवर गावात येण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच, मराठा आरक्षणाच्या वादामुळे यंदा कार्तिकी एकादशी पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना देण्यात येणार नाही, असा निर्णय पंढरपूर समितीने घेतला होता. परंतु मंगळवारी सकल मराठा समाजाने मांडलेल्या पाच मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर यंदाची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल, याबाबत निर्णय झाला. त्यानुसार आज फडणवीस दांपत्याने विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली.