हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुलगी अल्पवयीन असताना देखील तिचे लग्न लावून देणाऱ्या मुलीच्या आई-वडीलासह सासू-सासऱ्यावर कारवाई करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बोरगाव पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीचे आई-वडील, सासू-सासरे आणि पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा तालुक्यातील एका गावात पीडित मुलगी 17 वर्षांची असताना तिचे रत्नागिरी येथील एका तरुणाशी तिच्या आई-वडिलांनी लग्न लावून दिले. लग्नानंतर मुलगी गरोदर राहिली. काही दिवसांपूर्वीच तिने मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर तिचे अल्पवयीन असताना लग्न झाल्याचे समोर आले. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बोरगाव पोलिसांनी रत्नागिरीतील मुलीचे आई-वडील आणि सासू सासरे, पतीवर अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला.
बोरगाव पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मुलीचे आई-वडील, सासू-सासरे आणि पतीला अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे हे अधिक तपास करीत आहेत.