औरंगाबाद – आजकाल कशावरून कोण काय करेल काही सांगता येत नाही. अशीच एक घटना शहरात उघडकीस आली आहे. बार मध्ये गाणे बंद करून वेटरने ऑर्डर देण्याची विनंती केल्याचा राग आल्याने शिवसेनेचा पदाधिकारी व एका शिक्षणसंस्था चालकाच्या मुलाने चक्क बार व्यवस्थापकाला बेदम मारहाण करुन हॉटेल मध्ये धिंगाणा घालण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात व्यवस्थापक गंभीर जखमी झाला तसेच हाताचे मनगट तुटल्याने तीन तास शस्त्रक्रिया चालली. याप्रकरणी अनिकेत रतन वाघ आणि अभिषेक हिरा सलामपुरे यांच्यासह इतर दोघांवर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
https://twitter.com/AurangabadHello/status/1434032911506833414?t=I_6JAGsIiQjG1bUBDpgYvg&s=19
याविषयी अधिक माहिती अशी कि, हडको कॉर्नर येथे हॉटेल लोटस व बार आहे. हडकोतील दिलीप साहेबराव उचित (५१) हे तीन वर्षांपासून व्यवस्थापक आहे. २ ऑगस्ट रोजी ते नेहमीप्रमाणे हॉटेल मध्ये काम करत होते. कोवीडच्या नियमांमुळे रात्री दहा वाजताच बार बंद करण्याचे निर्देश असल्याने त्यांनी सर्व ग्राहकांना ऑर्डर देऊन बंद करणे बंधनकारक असल्याचे सांगितले. त्यानंतर साडेनऊ वाजता त्यांनी बार मधील गाणे देखील बंद केले. मात्र, काही वेळातच पुन्हा आरोपींनी बार मध्ये म्युजिक सिस्टम सुरू करुन मोठ्या आवाजात गाणे सुरू केले. कर्मचारी शंकर अधिकारी यांना बंद न करण्यासाठी धमकी दिली. त्यानंतर उचित यांना अनिकेत, अभिषेक व इतर टोळक्यांनी तुम्ही म्युजिक सिस्टीम बंद करायला का सांगितले असे म्हणुन धक्का बुक्की केली. आम्ही कोण आहोत, तुला माहितीये का, असे म्हणत बार बाहेर काढले व उचित यांना खाली पाडुन लाथाबुक्यांनी मारहाण केली केली. अभिषेक ने कमरेच्या बेल्टच्या लोखंडी क्लिपने वार केले. उलट, पोलीसांकडे तक्रार केल्यास तुला आम्ही ठार मारु अशी धमकी दिली. उचित यांचे मावस भाऊ रविकांत गवळी यांनी नंतर धाव घेतली.
त्यानंतर त्यांच्या जवाबावरुन बेगमपुरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक विशाल बोडखे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.