नवी दिल्ली । माजी भारतीय फलंदाज राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच बनल्याची बातमी समोर येताच जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. टी 20 विश्वचषकानंतर द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकापदाची जबाबदारी घेणार असल्याचे वृत्त आले आहे. त्याचे पहिले मोठे मिशन न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेपासून सुरु होईल. मात्र, BCCI ने अद्याप यावर अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. पण इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉनने उर्वरित देशांना आधीच इशारा दिला आहे.
वॉनने ट्विटरवर लिहिले, “जर राहुल द्रविड टीम इंडियाचा पुढील मुख्य प्रशिक्षक बनेल आणि हे खरे असेल तर बाकीच्या देशांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.” द्रविड कोच बनल्याची बातमी समोर आल्यानंतर वॉनसोबत माजी भारतीय फलंदाज वसीम जाफरनेही एक मजेदार ट्विट केले. जाफरने द्रविड कोच बनण्याचे श्रेय शार्दुल ठाकूरला दिले.
जाफरने लिहिले की,’कालपर्यंत राहुल द्रविड नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये (NCA) राहतील असे मीडिया रिपोर्ट होते, मात्र आज सकाळी बातम्या फुटल्या की तो टीम इंडियाचा कोच बनत आहे. मग मध्यरात्रीत काय घडले? माझा अंदाज असा आहे की, लॉर्ड शार्दुलने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी केकवर मेणबत्त्या पेटवल्या आणि त्याने राहुल भाईला कोच बनवण्यास सांगितले. कदाचित त्याची इच्छा पूर्ण झाली असेल.’
द्रविड 2023 विश्वचषकापर्यंत कोच असेल
तत्पूर्वी शनिवारी सकाळी असे वृत्त आले की, राहुल द्रविडने टीम इंडियाचा कोच बनण्यास होकार दिला आहे. शुक्रवारी आयपीएल फायनल दरम्यान त्याने संमती व्यक्त केली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारेल. म्हणजेच, मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडचे पहिले मिशन न्यूझीलंडविरुद्ध घरची वनडे मालिका असेल.
वास्तविक, द्रविडला कोच बनवण्याचा निर्णय BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर झाला. दोघांनीही द्रविडला ही जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली. सुरुवातीला द्रविड कोच होण्यास नकार देत होता. मात्र यावेळी त्याने होकार दिला.
द्रविडला 10 कोटी रुपये मिळतील
रिपोर्ट्स नुसार, राहुल द्रविडचा टीम इंडियासोबतचा करार 2023 च्या विश्वचषकापर्यंत असेल. त्याला 2 वर्षांसाठी 10 कोटी रुपये फी म्हणून मिळतील. मात्र, BCCI कडून अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.