कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
पायी वारीला विरोध करून पोलिसांनी वारकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढत वारकरी सांप्रदायाचे ज्येष्ठ मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांना कराड तालुक्यातील करवडी येथील श्रीकृष्ण गोपालन केंद्रात स्थानबद्ध केले आहे. दरम्यान बंडातात्या कराडकर यांची श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी सोमवारी भेट घेतली. यावेळी कराडकर म्हणाले कि, “हिंदूत्वावर काम करणारे भिडे गुरूजीही आज माझ्या भेटीला आले होते. वारकरी सांप्रदायाचे मुळ हिंदूच आहे. आणि तो सर्वधर्म समाजाचाहीआहे. त्यामुळेच शिवप्रतिष्ठान या हिंदू संघटनेला वारकऱ्यांवरील अन्याय सहन झाला नाही. या भावनेतूनच भिडे गुरुजींनी आपली भेट घेतली आहे.”
भिडे गुरुजी यांनी सोमवारी कराड तालुक्यातील करवडी येथे ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांची भेट घेतली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, वारकरी व शिवप्रतिष्ठानचे धारकरी उपस्थित होते. या भेटीदरम्यान बंडातात्या कराडकर म्हणाले, प्रशासनाने देहूमध्ये राक्षसी पद्धतीने वारकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढत मला स्थानबद्ध केले आहे. हा समस्त वारकऱ्यांवर झालेला अन्याय असून तो योग्य नसल्याची समाजभावना निर्माण झाली आहे. याच भावनेतून संभाजी भिडे (गुरूजी) यांनी माझी भेट घेतली आहे. त्यामुळे ही भेट केवळ औपचारिक असून यामागे अन्य कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शासनाने पायी वारीला विरोध करून हिंदू धर्माच्या प्रथा, परंपरा व संस्कृती एकप्रकारे खंडित करण्याचा प्रयत्न केला आहे. या विरोधाला न जुमानता आम्ही पायी वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी आंदोलन करीत पंढरपूरच्या दिशेने पायी चाललो असताना पोलिसांनी मला स्थानबद्ध केले. पायी वारीच्या परंपरेत खंड पडू नये, म्हणून चाललेल्या आमच्या प्रयत्नांबद्धल श्री भिडे गुरूजींनी आमच्याप्रती अभिमान व्यक्त केला. तसेच या भेटीप्रसंगी गुरुजींनी आम्हाला शिदोरी म्हणून संदेश दिला असून त्यांनी व्यक्त केलेली सहानभूतीची भावना आम्ही स्वीकारली असल्याचेही बंडातात्या कराडकर यांनी सांगितले.