सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
वाई- पाचगणी मुख्य मार्गावर पसरणी घाटातील नागेवाडी फाट्या नजिकच्या वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने मालवाहू पिकअप गाडी आज दुपारी बाराच्या सुमारास दरीत जाता जाता वाचली. दैव बलवत्तर म्हणून जिवितहानी झाली नाही. पाचगणीहून वाईकडे जात असताना नागेवाडी फाट्यानजिक वळणावर गाडी डाव्या बाजूचा कठडा तोडून पुढील बाजू दरीकडे झुकली नि दरीच्या काठावर असलेल्या झाडावर लटकली. प्रसंगावधान दाखवून ड्रायव्हर गाडीतून बाहेर पडला नि सुटकेचा निःश्वास टाकला.
काल पासून पाचगणी व परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. घाटात पाऊस कोसळत असताना आज मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास पिकअप गाडी क्रमांक (एम.एच. 11 -सी. एच- 7738) ही मालवाहू गाडी वाईच्या दिशेने जात असताना, हा अपघात घडला. घाटात संरक्षण कठडा व झाड असल्याने ही गाडी वरतीच लटकली. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी झाली नाही.
सातारा जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. तर महाबळेश्वर- पाचगणी परिसरात कालपासूनच पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे. वाई- पाचगणी दरम्यान असलेल्या पसरणी घाटात पिकअप गाडीचा अपघात झाला. दैव बलवत्तर असल्याने गाडी चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर आला. सध्या, गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.