Tuesday, February 7, 2023

शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटली; अधिकारी हैराण तर नागरिक त्रस्त

- Advertisement -

 

औरंगाबाद – शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गुरुवारी सकाळी फुटली. तब्बल ७०० मिलीमीटर व्यासाची ही जलवाहिनी पैठण रोडवरील कवडगाव ते ताहेरपूर दरम्यान फुटली. त्यामुळे शहराचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडले. ही जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम काल सकाळपासून सुरु झाले, मात्र रात्रीदेखील उशीरपर्यंत हे काम सुरुच होते. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

सुटे भाग मिळेना

सन १९७२ मध्ये टाकण्यात आलेली ही जलवाहिनी बीडाची असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली. जलवाहिनी फुटलेला भाग अतिशय छोटा होता. मात्र ती दुरुस्त करण्यासाठी बीडाच्या पाइपलाइनचे सुटे भाग आता मिळत नाहीत. त्यामुळे उपलब्ध साधनसामुग्रीच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळपासून जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत ते काम सुरुच होते. रात्री नऊ वाजेच्या दरम्यान दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर जायकवाडी येथील पंपहाऊसमधून एक पंप सुरु करण्यात आला. टप्प्या-टप्प्याने पंप सुरु करून पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

१९७२ ची पाईपलाईन 

औरंगाबाद शहराला दोन जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा केला जातो. यापैकी एक 1400 मिलीमीटर व्यासाची आहे तर दुसरी 700 मिलीमीटर व्यासाची आहे. ही जलवाहिनी 1972 मध्ये टाकण्यात आली होती. या दुसऱ्या 700 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून शहराला तीस टक्के पाणी मिळते. त्यामुळे आवश्यक तेवढ्या पाण्याचे प्रमाण गाठले जाते. हीच जलवाहिनी फुटल्यामुळे संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.