शहरातील एका वॉर्डाची लोकसंख्या राहणार नऊ हजार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार 42 प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. महापालिकेत 126 सदस्य राहणार असल्याने एका वॉर्डात सुमारे नऊ हजार 746 लोकसंख्या राहणार आहे. जुन्या रचनेत ही लोकसंख्या 12 ते 13 हजार अशी होती.

राज्य शासनाने महापालिकेची आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वाढीव लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या 126 एवढी करण्यात आली आहे. त्यानुसार 18 नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करून सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. आयोगाच्या आदेशानुसार प्रशासनाने काम सुरू केले आहे. शहराची 2011 च्या जनगणेनुसार लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 एवढी आहे. सदस्यांची संख्या 115 वरून 126 करण्यात आली असली तरी 12 लाख 28 हजार हीच लोकसंख्या गृहित धरली जाणार आहे. 126 सदस्यसंख्येनुसार प्रभागांची संख्या 42 झाली आहे. त्यानुसार एका प्रभागाची लोकसंख्या 26 हजार 315 ते 32 हजार 161 या दरम्यान असेल तर एका वॉर्डाची लोकसंख्या नऊ हजार 746 असणार आहे. 2011 च्या लोकसंख्येनुसार 2286 प्रगणक गट आहेत. त्यानुसार वॉर्ड व प्रभाग तयार करताना याच प्रगणक गटाचा वापर केला जाणार आहे.

मतदारांची दहा टक्के वाढ अपेक्षित
आगामी निवडणूकीसाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतला जाणार आहे. असे असले तरी मतदार संख्येत दहा टक्के एवढी वाढ अपेक्षित धरली जात आहे. सुमारे एक लाखापेक्षा अधिक मतदार वाढतील, असे उपायुक्त संतोष टेंगळे यांनी सांगितले. तसेच एकूण 126 वॉर्डांपैकी 63 वॉर्ड महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

Leave a Comment