कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
करवडी (ता. कराड) येथे उच्चदाब प्रणाली योजने अंतर्गत 33 केवी / 11 केवी (5MVA क्षमता) असलेले 2 कोटी 12 लक्ष खर्चाचे रोहित्र उभारण्यात येणार असून, करवडीसह परिसरातील तेरा गावातील शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. करवडी (ता. कराड) येथे त्यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
या समारंभास खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, लोकशाही आघाडी कराडचे अध्यक्ष जयंत पाटील, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ.संगीता साळुंखे, कराड उत्तर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष प्रशांत यादव, संजय गांधी निराधार योजना समिती कराडचे अध्यक्ष शंकरराव खापे, आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब सहकारी बँकेचे संचालक, युवा नेते सागर पाटील, कराड नगरपरिषदेचे विरोधीपक्षनेते सौरभ पाटील, राजेश पाटील-वाठारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून सामान्य जनता हाच केंद्रबिंदू मानून विधानसभेच्या माध्यमातून मतदार संघात अनेक विधायक कामे केली, २०१९ च्या विधानसभा निवडणूकीनंतर आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये माझ्यावर सहकार व पणन तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली, त्या माध्यमातून सहकार क्षेत्राला बळकट करण्याचा प्रयत्न असून, पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. यावेळी राष्ट्रीय पेयजल नळपाणी पुरवठा योजना, करवडी एस.टी. स्टँड ते आरफल कॉलनी रस्ता डांबरीकरण करणे, पी.जी.मोरे घरापासून ते संजीव देशपांडे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, न्यू इंग्लिश स्कूल इमारत दुरुस्ती व संगणक संच या कामाचे उद्घाटन तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजना अंतर्गत (उपकेंद्र) 33 केवी /11 केवी (5MVA क्षमता), अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे, करवडी एस.टी. स्टँड ते आरफळ कॉलनी उर्वरित रस्ता डांबरीकरण करणे या कामांचे या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, मानसिंगराव जगदाळे, प्रणव ताटे यांनी मनोगत व्यक्त केले, सूत्रसंचालन संभाजी चव्हाण यांनी केले, प्रास्ताविक किशोर पाटील यांनी केले व आभार संजय पिसाळ यांनी मानले.