कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील रेल्वेच्या भुयारी मार्गावरील प्रश्नाबाबात वारंवारं आदोंलनाचा इशारा दिला की, अधिकाऱ्याचे आश्वासन मिळे मात्र, काम होत नव्हते. अखेर अधिकाऱ्यांकडून काम होत नसल्याने रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी नेते सचिन नलवडे आणि रामकृष्ण वेताळ यांना चर्चेसाठी पुण्यात येण्याचे निमंत्रण दिले आहे.
गेली कित्येक दिवस पार्ले (ता. कराड) हद्दीतील रेल्वे गेट नं एल सी 98 याचे भुयारी मार्गाचे काम बंद असून ते लवकरात लवकर सुरू करणेसाठी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन नलवडे यांनी निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने बुधवारी पोलीस बंदोबस्तात कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु हे काम केवळ आंदोलन रोखण्याच्या दृष्टीने एक दिवसासाठी चालू ठेवण्यात येणार होते. त्यामुळे आंदोलकांनी पुन्हा आपला मोर्चा कराड रेल्वे स्टेशनकडे वळवला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन नलवडे, भारतीय किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अविनाश नलवडे, कराड तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील, उपसरपंच मोहन पवार, माजी सरपंच बाळासाहेब नलवडे, वडोली निळेश्र्वरचे अमित पवार, प्रदिप शेवाळे, आशोक मंडले, रोहीत पवार, बाबासाहेब पवार, संभाजी पवार, कराड शहारचे पोलीस निरीक्षक बाबर, एपीआय शहा दिवान, गोपनीयचे महेंद्र सावंत आदी उपस्थित होते.
गेल्या 20 दिवसापूर्वी रेल्वेच्या भुयारी मार्गाचे काम त्वरित सुरू करावे, त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करून भुयारी मार्गामध्ये साचून रहाणाऱ्या पाण्याची योग्य ती व्यवस्था करावी. स्थानिक लोकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे, यासाठी रेल्वे रोकोचा इशारा रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन नलवडे आणि परीसरातील ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनास दिला होता. तेंव्हा रेल्वे प्रशासनाच्या वतीने सिनियर सेक्शन इंजिनिअर सक्सेना यांनी 10 एप्रिल ते 31 मे अखेर पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावून लोकांसाठी मार्ग मोकळा करून देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु 10 दिवस उलटून गेले तरी अद्याप काम सुरू न केल्याने सचिन नलवडे यांनी 20 तारखेला पुन्हा आंदोलन करण्यात येणार असल्याचे आणखी एक निवेदन दोन दिवसापूर्वी रेल्वे प्रशासनास दिले होते. त्या अनुषंगाने आज रेल्वे प्रशासनाने काम सुरू केले. परंतु यावर समाधान न मानता ग्रामस्थांनी कराड रेल्वे स्टेशन येथे जाऊन भर ऊन्हात ठिय्या मारला. यावेळी सातारहुन रेल्वे अधिकारी प्रत्यक्ष चर्चेला येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु एक तास उलटून गेला तरी कोणीही भेटीस आले नाहीत. अखेर रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन नलवडे यांनी केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून याबाबत चर्चा केली. त्यानंतर रेल्वे स्टेशनवरील आंदोलन मागे घेण्यात आले.