औरंगाबाद | बावीस वर्षाच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर कटकटगेट ते पोलीस मेस रोडपर्यंत सिमेंट काँक्रीटचे काम होत असल्याने रस्त्याचे भाग्य उजळले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधीतून हे काम मनपाच्या वतीने काम सुरु आहे. पण काही मालमत्ताधारकांच्या विरोधामुळे अडथळे निर्माण होत आहे. कटकटीमुळे रहीवाशांना वेठीस धरले जात आहे. एकाच रस्त्यावर रहदारी वळवण्यात आल्याने रस्त्यावर वाहने चालवण्यासाठी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या ना त्या कारणांमुळे रस्त्याच्या काम बंद पाडले जात असल्याने ठेकेदाराची गोची होत आहे.
कटकटगेट जवळ 18 मीटर रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटचे काम स्थानिक काही लोकांनी बंद पाडले. महापालिका प्रशासनाच्या वतीने गंभीरतेने दखल घेतली जात नाही. नगरभूमापन नकाशाप्रमाणे काम होत नसल्याचे काम थांबवणा-यांचे म्हणणे आहे. कटकटगेट लगत 18 मीटरचे जेव्हा काम सुरु होत रस्त्याच्या मधोमध असणारे विजेचे खांब पण काढण्यात आले नाहीत. मग येथून जड वाहनांची रहदारी कशी होईल, असा प्रश्न निर्माण होत आहे. येथे फुटपाथसाठी जागा सोडण्यात आली नाही. सिडको व जुने शहर व जाधवमंडी येथे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. एमआयएमच्या माजी नगरसेविका नरगिस शेख सलीम यांनी हा रस्ता बनविण्यासाठी आपल्या कार्यकाळात प्रयत्न केले. कटकटगेटच्या दोन्ही बाजूला 18 मीटर, पुढे पोलीस मेसपर्यंत 30 मीटर , दोन्ही बाजूने 100 फुटाचा रस्ता आहे.
रस्त्यावर पूर्णपणे अतिक्रमण काढण्यात आले नाही. 2009 मध्ये जे अतिक्रमण मार्कींगनुसार काढण्यात आले होते, त्यानंतर पुन्हा अतिक्रमण झाले. काम सुरू करण्याच्या अगोदर अतिक्रमण मनपाने काढून घ्यावे, असे आदेश खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी देवूनसुध्दा काढण्यात आले नाही. काही मालमत्ता वाचवण्यासाठी मनपाचे काही अधिकारी प्रयत्न करत आहे. वेळोवेळी मनपा प्रशासनाला काम नियमानुसार करावे यासाठी पत्रव्यवहार केला. जुने नकाशाप्रमाणे 30 मीटरचा रस्ता आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदार म्हणत आहे हा रस्ता 24 मीटरचा आहे. यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. संबंधित काम नियमानुसार होत नाही. ठेकेदाराला वेळोवेळी कळवले. क्युरींग बरोबर केली जात नाही.
या रस्त्यावर 7 शाळा, 5 हॉस्पिटल आहे. रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा. महापालिका मुस्लिम बहुल वार्डात दुजाभाव करत आहे. हा रस्ता दर्जेदार व चौकाचे अतिक्रमण काढून अन्य चौकाप्रमाणे सुंदर व आकर्षक सुशोभीकरण करण्यात यावे. अशी मागणी एमआयएमचे शेख सलीम सहारा यांनी केली आहे. मनपा आयुक्तांनी प्रत्यक्ष येथे भेट देवून पाहणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. समाजसेवक जमील खान यांनी अडथळे आणणा-यांवर महापालिकेने कायदेशीर कारवाई करुन रस्त्याचे काम लवकर करावे. ज्या मालमत्ताधारकांनी जागेचा मोबदला व टिडीआर घेतलेला आहे तरीही राजकारण केले जात आहे, असा आरोप लावला आहे. जमील खान यांनीही महापालिकेला पत्र देवून येणारे अडथळे दूर करुन काम लवकर करण्याची मागणी केली आहे.