‘भूमिकेच्या लांबीपेक्षा भूमिका महत्वाची’! राधे’तील लहान भूमिकेमुळे चाहते नाराज; तरडेंनी काढली समजूत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाला संमिश्र स्वरूपाचा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी दगडू दादा ही भूमिका साकारली आहे. हि भूमिका सहाय्यक असून याबाबत त्यांच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण या चित्रपटात काम का केले याबाबत आता प्रवीण यांनी स्वतःच खुलासा केला आहे. त्यांनी कोणत्याही आढेवेढ्यांशिवाय हे स्पष्ट केले कि सलमानसोबत चांगले नाते निर्माण करण्यासाठी मी राधे हा चित्रपट स्वीकारला.

न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडे यांनी सांगितले की, राधे पाहून माझ्या फॅन्सची निराशा झाली आहे. तू इतकी छोटी भूमिका का साकारली असे त्यांचे म्हणणे आहे. पण मी छोट्या छोट्या भूमिका साकारूनच इथपर्यंत आलो आहे असे मला त्यांना आवर्जून सांगायचे आहे.

भूमिकेच्या लांबीपेक्षा ती भूमिका कशी आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचे असते. सलमान खानसोबत चांगले संबंध निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत काम करण्यासाठीच मी या चित्रपटात काम करण्यास होकार दिला. माझ्यासाठी हा अनुभव खूपच चांगला होता. एक व्यक्ती म्हणून मला ते प्रचंड आवडतात.

प्रवीण तरडे यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला कुंकू या मालिकेसाठी तब्बल एक हजार भागांचे तोडीचे लिखाण केले होते. ही मालिका अत्यंत लोकप्रिय झाली होती. त्यानंतर तरडेंनी पिंजरा, तुझे माझं जमेना, अनुपमा, असे हे कन्यादान यांसारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांचे दर्जेदार लेखन केले. आज जेव्हा प्रवीण तरडे यांच्याकडे पहिले जाते तेव्हा, एक अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून त्यांची स्वतःची ओळख निर्माण केली असल्याचे स्पष्ट दिसून येते. मालिका असो किंवा चित्रपट त्यांनी नेहमीच प्रेक्षकांना अव्वल आणि उत्कृष्ट दर्जाचे मनोरंजन देऊ केले आहे. खरंतर कोणतीही भूमिका लहान किंवा मोठी नसते. ती भूमिका साकारणारा कलाकार तिचा ठसा उमटवीत असतो, हेच खरं.