कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्यावतीने सन 2020-21गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यापोटी प्रति टनास 150 रुपयांचा दुसरा हप्ता ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे. दुसरा हप्ता बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आल्याचे एसएमएस ऊस उत्पादक सभासदांच्या मोबाईलवर येऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कामकाज सुरू असून कारखाना सभासदांच्या हितासाठी सदैव कार्यरत आहे. या कारखान्याने, कारखान्याचे संस्थापक आदरणीय पी. डी. पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाने सभासदांच्या ऊसाला योग्य व रास्त भाव देण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. सन 2020-21 गळीत हंगामामध्ये गळीतास आलेल्या ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटनास 150 रुपये ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले आहेत.
सध्या मान्सून पूर्व शेतीच्या मशागतीची सर्व कामे पूर्ण झाली असून पेरणीची लगबगही सुरू झाली आहे, आशा योग्य वेळी सह्याद्रि कारखान्याने ऊस बिलाचा दुसरा हप्ता प्रतिटनास 150 रुपयांनी दिला असल्याने, शेतीसाठी खते, औषधे, बी-बियाणे आदिसाठी त्याचा उपयोग होणार आहे. यापूर्वी कारखान्याने पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटनास 2 हजार 651 रुपये अदा केले आहेत. दुसरा हप्ता 150 रुपयांनी जमा झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.