औरंंगाबाद : दारुच्या नशेत पाय घसरून पडल्याने पीत्याचा मृत्यू झाल्याचे सांगत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र घाटी रुग्णालयात झालेल्या शवविच्छेदनानंतर सततच्या मारहाणीला कंटाळून पीत्याला मारहाण करुन खून केल्याची कबुली ऋषीकेश राजेश मुसळे (वय २३, रा. साई नगर, सिडको, बजाज नगर) याने दिली असून त्याला २७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. गरड यांनी दिले आहेत.
एमआयडीसी वाळुज ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ७ एप्रिल रोजी ऋषीकेशने वडील राजेश मुसळे (वय ५५) यांना घाटी रुग्णालयात दाखल केले व दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरी अचानक तोल जावून पडल्याने ते बेशुध्द झाल्याचे सांगितले. रात्री ९ वाजेच्यासुमारास डॉक्टरांनी राजेश मुसळे यांना मयत घोषीत केले होते. ८ एप्रिल रोजी पंचनामा करण्यात येवून शवविच्छेदन करण्यात आले होते. शवविच्छेदनात अंगावर जागोजागी मारहाणीच्या आणि ओरबडल्याच्या जखमा दिसून आल्या होत्या.
पोलिसांनी संशयाच्या आधारे ऋषीकेशला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने राजेश मुसळे हे दारु पिण्याचे सवईचे होते. ते सतत दारुच्या नशेत आई, बहिण व ऋषीकेशला शिवीगाळ करुन मारहाण करित होते. याच कारणामुळे ७ एप्रिल रोजी राजेश यांना झाडु, लाकडी दांड्याने जबर मारहाण केल्याची कबूली दिली. व त्यातच राजेश मुसळे यांचा मृत्यू झाला. प्रकरणात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.