पुणे प्रतिनिधी । विशाखा महाडिक
राज्यभरात गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi 2023) धामधूम सुरु आहे. अशीच धामधूम आता काश्मीरमध्येही सुरु असेल. कारण यंदा काश्मीरमध्ये पहिल्यांदाच गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. काश्मीरमधील ‘गणपतीयार ट्रस्ट’मध्ये गणेशोत्सव साजरा व्हावा, याकरिता पुण्यातील सात मानाच्या गणपती मंडळांनी पुढाकार घेतला आहे. काश्मीरमध्ये यंदा दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी श्रीनगर येथील गणपतयार टेम्पलचे संदीप कौल आणि शिशांत चाको यांच्याकडे पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाची प्रतिकृती सुपूर्त करण्यात आली. पुण्यातील कसबा गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ, गुरुजी तालीम गणपती मंडळ, तुळशीबाग गणपती मंडळ, केसरीवाडा गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ या सात मंडळांचा या उपक्रमात सहभाग आहे. हा कार्यक्रम गुरुवारी १४ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे उत्साहात पार पडला. तत्पूर्वी अभेद्य ढोलताशा पथकाचे जोरदार वादन झाले.
यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त, उत्सव प्रमुख पुनीत बालन, ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालिम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी , तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित, केसरी गणेशोत्सवाचे प्रतिनिधी अनिल सकपाळ, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव प्रमुख पुनीत बालन म्हणाले, ‘हिंदुस्तानात गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकांनी केली. आज हाच गणेशोत्सव इतर देशातही साजरा होतो. मग तो आपल्याच देशात काश्मीरमध्ये का नाही? असा प्रश्न पडला आणि त्यामुळेच काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय आम्ही सर्व मानाच्या मंडळांनी घेतला. या माध्यमातून काश्मीर खोऱ्यात सामाजिक सलोखा वाढण्यासोबतच सुख-समृध्दी आणि शांतताही वाढेल, असा विश्वास आहे’.
यावेळी काश्मीरमधील गणपतीयार ट्रस्टचे संदीप कौल म्हणाले, ‘पुण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या पुढाकाराने कश्मीरमध्ये पहिल्यांदाच आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत. याचा आम्हाला आनंद होत आहे. लाल चौकापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध गणपतयार मंदिरात येत्या गणेशोत्सव चतुर्थीला आम्ही या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करणार असून दीड दिवसानंतर विसर्जन केले जाईल. पहिल्यांदाच अशा पद्धतीने काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा होणार आहे. यावेळी श्रीकांत शेटे म्हणाले, ‘देशाचा स्वर्ग काश्मीर भाग आहे, बाप्पाचा आशीर्वाद येथे वाढण्यासाठी आशीर्वाद म्हणून ही मूर्ती प्रदान केली आहे. उन्नत, सशक्त, शांती, सुख काश्मिर येथे नांदण्यासाठी ही बाप्पाची मूर्ती आम्ही सर्वजण एकत्र येऊन देत आहोत’. तर अण्णा थोरात म्हणाले, ‘पुण्याप्रमाणेच काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करावा, याकरिता हा पुढाकार घेण्यात आला आहे. पुण्यात सर्व धर्मिय नागरिक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात, त्याप्रमाणे काश्मीरमध्येसुध्दा गणेशोत्सव साजरा व्हावा, अशी आमची भावना आहे’.