औरंगाबाद : दहावी बारावीसाठी अर्ज भरताना जेवढ्या क्षमतेची परवानगी तेवढेच विद्यार्थी बसवा अशा सूचना दिल्यानंतरही अनेक शाळा महाविद्यालयांनी अधिकचे विद्यार्थी बसवल्याचे सांगण्यात येते. यावरून अशा संस्थांचा मंडळ शोध घेत आहेत. मात्र यंदा संचमान्यता नसल्याने नेमके किती विद्यार्थी याची आकडेवारी गोंधळाची ठरण्याची शक्यता आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी बारावीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. औरंगाबाद विभागातून अनेक संस्था अतिरिक्त विद्यार्थी परीक्षेला बसवतात. क्षमतेपेक्षा जास्तीचे प्रवेश देण्याचे गैरप्रकार मागील परीक्षा दरम्यानही समोर आले होते. १२० ची परवानगी असताना २०० पेक्षा अधिक विद्यार्थी संबंधित शाळा कॉलेजातून बसवले जातात.
कॉफीचे केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या काही केंद्रावर असे प्रकार घडल्याचे समोर आले होते. त्यावर संचमान्यता व नोंद असलेल्या विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र स्वीकारले जाणार असल्याचे मंडळाने आदेश दिले होते. परंतु नियम पाळला गेला नाही. यंदा मान्यतेपेक्षा अधिकचे विद्यार्थी बसवणाऱ्या संस्था आहेत का, याचा आढावा मंडळ घेत आहे. अशा संस्थांची संख्या जास्त असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यंदा संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. अशा वेळी नेमकी संख्या कोणती निश्चित करणार याबाबत संभ्रम असल्याचे सांगण्यात येते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दहावी-बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. त्यानंतर शिक्षण विभागाकडून लगेचच बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान बारावी तर २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यातून एक लाख ५१ हजार ८४७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर दहावीच्या परीक्षेसाठी विभागातून एक लाख ८३ हजार ६११ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा