काबूल । पंजशीर व्हॅली हे अफगाणिस्तानमधील अशा काही क्षेत्रांपैकी एक आहे जे अद्याप तालिबानच्या ताब्यात आलेले नाही. येथील बंडखोरांचे नेतृत्व करणाऱ्या अहमद मसूदचे सेनानी लढाईसाठी सज्ज झाले आहेत. नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट म्हणजेच नॉर्दर्न अलायन्सला हेलिकॉप्टर्सद्वारे शस्त्रेही पुरवली जात आहेत. उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह देखील येथे आहेत. मसूद म्हणाला की,” आमची युद्धाची तयारी आहे, मात्र जर मार्ग काढण्यासाठी चर्चा झाली तर ते त्यासाठीही तयार आहेत.”
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या रिपोर्ट नुसार, आता तालिबानविरुद्ध युद्ध लढण्यासाठी नॉर्दर्न अलायन्सला अधिक बळ मिळाले आहे. अफगाण लष्कराच्या माजी कमांडरांनी अहमद मसूदसोबत पंजशीरला पोहोचल्यानंतर हात मिळवणी केली आहे. माजी कमांडरांनी हेलिकॉप्टर्समधून त्यांच्यासोबत शस्त्रास्त्रांचा साठा देखील आणला आहे.
माजी उपराष्ट्रपती अहमद झिया मसूद आणि नॉर्दर्न अलायन्सचे माजी कमांडर अमानुल्ला गुलजार तालिबानविरोधी गटाला मदत करण्यासाठी पंजशीरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबतच काही माजी अफगाण सैनिकही आहेत.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या रिपोर्ट नुसार, अहमद झिया मसूद आणि अमानुल्ला गुलजार त्यांच्या समर्थकांसह ताजिकिस्तानमार्गे पंजशीरला पोहोचले आहेत. हेलिकॉप्टर्सद्वारे ताजिकिस्तानमधून शस्त्रे आणली गेली आहेत.
तालिबान लढाऊंना नॉर्दर्न अलायन्सकडून पंजशीर खोऱ्यातील अंद्राब, बागलाणसह काही भागात कठीण आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. काल रात्री, अंद्राबमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान 50 तालिबानी मारले गेले. त्याच वेळी, यापूर्वी नॉर्दर्न अलायन्सने बागलाणमध्ये देखील सुमारे 300 तालिबान मारल्याचा दावा केला होता. मात्र, तालिबानने याचा इन्कार केला आहे.
रेझिस्टन्स फ्रंटचे प्रवक्ते अली मैसम नझारी यांनी AFP वृत्तसंस्थेला सांगितले की,” तालिबानच्या विरोधात सुमारे 9,000 सैनिकांची फौज तयार करण्यात आली आहे. या सैन्याला सतत प्रशिक्षण दिले जात आहे. आमच्याकडे वाहने आणि शस्त्रे देखील आहेत.” नझारी पुढे म्हणाले की,” आम्हाला सरकार चालवण्यासाठी नवीन व्यवस्था हवी आहे आणि त्यासाठी वाटाघाटी करण्यास तयार आहोत, पण गरज पडली तर आम्ही लढाईपासून मागे हटणार नाही.”
दुसरीकडे, तालिबानही पंजशीरचा मुद्दा लवकर सोडवण्याच्या बाजूने आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, जर पंजशीरच्या लढवय्यांना शांत केले नाही तर त्यांना सरकार चालवताना अडचणींना सामोरे जावे लागेल. सरकारमध्ये सामील होण्यासाठी तालिबान वार्ताहर अहमद मसूदशी सतत चर्चा करत आहेत.”