बारामती येथे रविवारी ऐतिहासिक कार्यक्रमात उलगडणार सगर राजपूत समाजाची यशोगाथा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : येत्या रविवारी बारामती येथे क्षत्रिय सगर राजपूत सगर मराठा संघटनेच्यावतीने ‘क्षत्रिय सगर सुर्यवंशी यशोगाथा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुजरात येथील प्रसिद्ध लोककलाकार मंगलभाई राठोड आणि त्यांचे सहकलाकार संगीतमय कार्यक्रमातून सगर राजपूत समाजाचा महाराष्ट्रातील इतिहास मांडणार आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संघटनेच्यावतीने नागरिकांना कार्यक्रमाला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘क्षत्रिय सगर सुर्यवंशी यशोगाथा’ हा कार्यक्रम येत्या रविवार ३० जुलै २०२३ रोजी चिराग गार्डन बारामती येथे दुपारी ठिक २.३० ते ७.३० वेळेच्या दरम्यान होणार आहे.

या खास कार्यक्रमासाठी अनेक प्रमूख मान्यवर आपली उपस्थिती नोंदविणार आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तर क्षत्रिय राजपूत करनी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राज शेखावत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, सुप्रसिद्ध हिंदी हास्यकवी टी.व्ही. कलाकार शंभू शिखरजी, पराग बेडसे, महेश दास, प्रमोद राणाजी, संभाजी ब्रिगेडचे अमोल काटे, मुकुंद काकडे, प्रशांतनाना सातव, मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध विधिज्ञ सुधीर पाटसकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे. विशेष म्हणजे, याच कार्यक्रमात रणजीत ताम्हाणे लिखित ‘सुर्यवंशी सगर राजपूत मराठा’ या ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशन ही मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.

या पुस्तकात एक हजार वर्षांपूर्वी राजपूतान्यातून महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेल्या सगर राजपूत समाजाचा काळाच्या पडद्याआड गेलेला मूळ इतिहास ताम्हाणे यांनी दीर्घ संशोधन करत सबळ पुराव्यांनिशीचा इतिहास मांडला आहे. दरम्यान, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी समाजातील लोकांनी तसेच इतिहासप्रेमी मंडळींनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष रणजीत ताम्हाणे यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी बारामती नगरपरिषदेकडून खास नियोजन करण्यात आहे. तसेच या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी अनेकांनी उत्सुकता देखील दाखवली आहे.