हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड शहरानजीक असलेल्या मसूरच्या रेल्वेच्या उड्डाणपुलावरील कमानीवर सुशोभीकरणासाठी जर्मनीहून आणलेली अडीच लाख रुपये किमतीची एलईडी लाईट ४ दिवसात गायब झाली आहे. धक्कादायक म्हणजे लाईटची चोरी दिड महिन्यापूर्वी होवूनही याबाबतची कोणतीही तक्रार अद्यापही पोलिसात दाखल झाली नाही. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून केला जात आहे.
रेल्वे प्रशासनाने दीड महिन्यापूर्वी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मसूर येथील उड्डाणपुलावर अडीच लाख रुपये किमतीची तिरंगा लाईट एलईडीच्या स्वरूपात बसविली होती, सदरची एलईडी लाईट चार दिवसात गायब झाली असल्याचे ग्रामस्थांना समजले. या चोरीच्या प्रकारामुळे अधिक माहिती ग्रामस्थांनी घेतली असता, चोरी झाली मात्र त्यांची कुठेच नोंद नसल्याचे समोर आले.
या पुलावरील एलईडी लाईट चोरी कोणी केली? अजूनही त्याची साधी तक्रारही का नाही? यामागे कोणाचं साटेलोटे तर नाही ना? की शासनाला चुना लावला जातोय असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत मोठे गौंडबंगाल असल्याबाबतची चर्चा ग्रामस्थांत सुरू आहे. आता पुन्हा एकदा या पुलावर एलईडी लाईट आणली जाणार असून त्याची आर्डर संबधित कंपनीला दिली आहे.