व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर झालेल्या वादातून दोघांवर चाकू हल्ला

सातारा । खटाव तालुक्यातील चितळी येथे वाढदिवसाच्या पार्टीनंतर झालेल्या वादातून दोघांवर चाकूने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी खटाव तालुकयातील चौघांवर मायणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश मल्हारी पाटोळे व राजेंद्र दिलीप जाधव (दोघे रा. मायणी ता.खटाव) असे या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, चितळी येथील अमोल महाडिक या युवकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी येथील संध्यामठ येथे चितळी, विटा, मायणी येथील युवक गुरुवारी रात्री एकत्र आले होते. वाढदिवसानिमित्त येथे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टी झाल्यानंतर युवकांमध्ये किरकोळ वादावादी झाली ही वादावादी झाल्यानंतर नीलेश पाटोळे व राजेंद्र जाधव हे मायणीला निघाले होते. त्यावेळी संशयित सौरभ दयानंद पवार, मयुर दयानंद पवार, अमोल महाडिक (सर्व रा. चितळी ता.खटाव) व गणेश अरविंद निकम (रा. गुंडेवाडी ता. खटाव) यांनी हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ते दोघे थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्यांची चौघा संशयितांनी अडवणूक करून तुम्हाला लय मस्ती आली आहे, आज तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून नीलेश पाटोळे व राजेंद्र जाधव या दोघांवर धारदार चाकूने वार करून तेथून पळून गेले. दरम्यान, रक्तबंबाळ अवस्थेत नीलेश पाटोळे यांनी मायणी येथे फोन करून काही तरुणांना बोलावून घेतले. त्या तरुणांनी या दोघांना मायणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी दोघांनाही कराड येथे पाठवण्यात आले. या घटनेची मायणी पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, तपास सपोनि मालोजीराजे देशमुख करत आहेत.