सातारा | आखेगणी (ता. जावळी) येथे मुसळधार पावसात अंगावर वीज पडून ज्ञानेश्वर गावडे (वय 35) या युवा शेतकर्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की आखेगणी येथे सायंकाळी चारच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळला. या वेळी विजांचा कडकडाट झाला. ज्ञानेश्वर तुकाराम गावडे हा युवक घराच्या जवळच असणारी गवताची गंज भिजू नये, म्हणून त्याच्यावर झाकण टाकण्यासाठी गेला होता.यावेळेस अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. वीजेच्या धक्क्याने तो भाजून जमिनीवर पडला. ग्रामस्थांना ही माहिती समजताच त्याला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतू भिलार येथील खासगी डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता तो ज्ञानेश्वर मयत झाल्याचे सांगितले.
ज्ञानेश्वर हा गरीब शेतकरी कुटुंबातील असून, वडील वृध्द आहेत. तो स्ट्रॉबेरी शेती करून आपली उपजीविका करत होता. या शेतीवरच त्याचे कुटुंब अवलंबून होते. घरात ज्ञानेश्वर हा घरातील कर्ता मुलगा असल्याने त्याचेवर काळाने घाला घातल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूच्या घटनेने आखेगणी गावावर शोककळा पसरली आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group