अमरावती : हॅलो महाराष्ट्र – ( आशिष गवई)- मेळघाटातील दोन वर्षीय चिमुरड्याला आजीने ताप आल्यानंतर पोटावर चटके देत अघोरी प्रथेने अंधश्रद्धेचा कळस गाठला होता . त्यानंतर बाळाची तब्येत बिघडल्यामुळे त्याला तडकाफडकी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते . त्यानंतर मेळघाटातील खटकली येथील राजरत्न जामूनकर या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा आजीवर चिखलदरा पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत.
घडलेल्या घटनेने जिल्हाभर संताप व्यक्त केला जात होता . तर बाळाची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केल्या जात होती . मात्र अखेर आज सायंकाळ दरम्यान या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे . त्यामुळे मेळघाटात अंधश्रद्धेने पुन्हा एकदा निष्पाप बालकाचा बळी घेतलेला आहे.
सदर घटनेने अमरावती जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचे मन सुन्न झालेले आहे . तर अंधश्रद्धेतून असेही प्रकार नियमित मेळघाटामध्ये होत असल्याने आता या प्रकारावर केव्हा आळा बसेल हा प्रश्न पुन्हा निरुत्तरीत करून जाते . विशेष म्हणजे मेळघाटात मोठ्या प्रमाणावर सामाजिक संस्था (ngo) वर्षभर काम करत असल्याचा दावा करतात मात्र त्यांच्या या कामावर अजूनही मेळघाटात जनजागृती झाली नसल्याचेही पुन्हा उघड झाले आहे .या प्रकारानंतर मात्र आता जिल्ह्याच्या पालकमंत्री मेळघाटामध्ये कडक पावले टाकणार असल्याचे समजत आहे.