अजगरास जाळून मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणे पडले महागात ; तीन जणांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :  राजापूर तालुक्यातील नाटे पडवणे वाडीत कोंबडीच्या खुराड्यात जाऊन कोंबड्या खात असलेल्या अजगरास जिवंत जाळून मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर वन विभागातील अधिकाऱ्यांनी या व्हिडीओवरून घटनास्थळी जाऊन आरोपींचा शोध घेतला असता यामध्ये तीन जण आरोपी आढळून आले. या तीन जणांवर गुन्हा दाखल करीत त्यांना अटकही करण्यात आली आहे.

नाटे पडवणे वाडीत राहत असलेल्या विजय भिकाजी पारकर (वय 53) यांच्या घराजवळ एक मोठा अजगर आला होता. भुकेलेल्या अजगराने जवळच असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यातील एका कोंबडीला भक्ष्य केले. अजगर आपली कोंबडी खात असल्याचे विजय पारकर यांच्या दृष्टीस पडल्यानंतर त्यांनी रागाच्या भरात अजगराला एकाच ठिकाणी रोखून धरण्यासाठी कांबेरु आणले आणि ते जोराने अजगराच्या अंगावर मारले. यामुळे अजगराच्या तोंडातून कोंबडी सुटली. आपली कोंबडी मेल्याचा राग मनात धरून विजय पार्कर यांनी वंदना पारकर, मानसी पार्कर यांच्या मदतीने अजगरास जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजगर अर्धवट अवस्थेतच जळले.

कोंबडी मृत झाल्याच्या रागातून विजय भिकाजी पारकर यांनी वंदना विजय पारकर (वय 44), मानसी मंगेश पारकर (27) यांच्या मदतीने अजगराला नारळाच्या झावळ्या गोळा करुन त्यामध्ये जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. अजगर आगीमुळे मृत झाला मात्र पूर्ण जळला नाही. त्यांनी अर्धवट जळालेले अजगर नजीकच्या ओढ्यात नेऊन टाकले.  तसेच या पारकर कुटुंबातील व्यक्तींनी अजगराला जळतानाचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरलही केला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ वनविभागाच्या हाती लागल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पारकर कुटूंबातील तिघांवर कारवाई केली. तसेच तीन वर्षां पर्यंत कारावासाची शिक्षा, 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा केली. वनविभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड, राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक सागर गोसावी, सागर पाताडे, संजय रणधीर यांनी पंचनामा करुन राजापूरच्या पशुधन अधिकाऱ्यांकडे अजगर सुपूर्द केले. पशुधन अधिकाऱ्यांनि त्या मृत अजगराचे शवविच्छेदन केले.