कराड:- छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राची नव्हे तर आपल्या देशाची अस्मिता आहे. त्यांनी कायम जनतेच्या सुरक्षेचाच विचार केला. लोकांना नेहमी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. छत्रपतींच्या विचारांचा वारसा जोपासत अजिंक्य मंडळाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवून आदर्शवत कार्य केले आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
आगाशिवनगर आझाद कॉलनी येथील अजिंक्य नवरात्र व गणेश मंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त सीसीटीव्ही लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, नगराध्यक्षा निलम येडगे, नगरसेविका सुशिला शिंगण, नगरसेवक सागर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य विद्याताई खराडे, दैनिक मुक्तागिरी कराड कार्यालयाचे प्रमुख संदीप चेणगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बी. आर. पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. जिद्दीने, चातुर्याने आणि बुध्दी वापरून शिवाजी महाराजांनी समस्यांवर मात करत प्रचंड यश संपादन केले आणि स्वराज्याची स्थापना केली. मंडळांनी महाराजांच्या विचारांचे आचरण करून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपापल्या विभागात उपाययोजना कराव्यात. अजिंक्य मंडळाने आजपर्यंत राबवलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.
नगराध्यक्षा येडगे म्हणाल्या, उत्स्फूर्तपणे व मंगलमय वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. अजिंक्य मंडळातर्फे आझाद कॉलनीमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यामुळे कायदा, सुव्यवस्था व गुन्हेगारी रोखण्यास चांगली मदत होणार आहे. इतर मंडळांनाही याप्रमाणे आपल्या विभागात सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिक लोखंडे, अमित कचरे, स्वप्नील जाधव, विनायक चव्हाण, अथर्व केळुसकर, मयूर चव्हाण, समीर शिकलगार यांच्यासह अजिंक्य मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रविंद्र काजारी यांनी सुत्रसंचालन केेले. राजेंद्र केळुसकर यांनी आभार मानले.