कोल्हापूर प्रतिनिधी |कोल्हापूरच्या गजानन महाराजनगर इथल्या प्रतीक नरके यांचा बंगला फोडून चोरट्यांनी ३४ तोळे दागिने, दीड किलो चांदी, २० हजारांची रोकड आणि इलेक्ट्रानिक वस्तू असा सुमारे १५ लाखांचा ऐवज लंपास केला. मध्यरात्री हा प्रकार उघडकीला आला. बंगल्यातील सार्या किमती ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने नरके कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. गजबजलेल्या, मध्यमवर्गीय कॉलनीतील घटनेमुळे नागरिकांत भीतीचे सावट निर्माण झालं आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळाची पाहणी करून, सराईतांचा छडा लावण्याच्या सूचना राजवाडा पोलिसांना दिल्या आहेत. ठसेतज्ज्ञ, श्वानपथकालाही सकाळी पाचारण करण्यात आले होते.
भांडी धुलाई पावडर विक्री व्यावसायिक नरके यांचे इचलकरंजी येथील नातेवाईक आजारी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची मातोश्री कल्पना रुग्णाच्या सेवेसाठी गेले चार दिवस रुग्णालयात आहेत. नातेवाईकांची प्रकृती अत्यवस्थ बनल्याने प्रतीक रात्री रुग्णालयात मुक्कामाला राहिले, पत्नी श्रद्धा लक्ष्मीपुरी येथील माहेरी गेल्या. घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी बंगल्याला टार्गेट केले. पहाटे साडेतीनच्या सुमाराला चोरट्यांनी कटावणीने कडी-कोयंडा उचकटून बंगल्यात प्रवेश केला.
स्वयंपाक खोलीलगत देवघरातील कपाट फोडले. त्यामधील चांदीच्या वस्तू, दागिने लंपास केले. दुसर्या मजल्यावरील बेडरूममधील दोन कपाटे, बॅगा उचकटून दोन गंठण, तीन मोत्याचे हार, राणीहार, कर्णफुले, सोनसाखळी, सोन्याचे कान, सात टॉप्स, बिलवर, पाटल्या, ब्रेसलेट असे ३४ तोळ्यांचे दागिने, दीड किलो चांदीच्या वस्तू, २० हजारांची रोकड, इलेक्ट्रानिक्स वस्तू असा १५ लाख रुपये किमतीच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. घटनास्थळी शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत, राजारामपुरीचे निरीक्षक सुनील पाटील, लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक वसंतराव बाबर, शाहूपुरीचे निरीक्षक संजय मोरे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली