टीम, HELLO महाराष्ट्र । सन १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केली होती. त्यानंतर राजधानी दिल्ली सहित देशातील अनेक शहरांमध्ये शिखविरोधी दंगली उसळल्या होत्या. या दंगलीत देशात एकूण ३ हजारांहून अधिक लोक मारले गेले होते. फक्त दिल्लीतच २ हजार जणांना प्राण गमवावे लागले होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. मात्र आता देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी १९८४ च्या शिख दंगलीबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.
सिंग यांनी ”जर तत्कालीन गृहमंत्री पीव्ही नरसिंह राव यांनी इंद्र कुमार गुजराल यांचा सल्ला ऐकला असता तर दिल्लीत झालेली शिख दंगल टाळता आली असती” असं म्हटलं आहे. इंद्र कुमार गुजराल यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग बोलत होते. यावेळी मनमोहन सिंग म्हणाले की, ‘गुजराल यांनी नरसिंहराव यांना लष्कराला पाचारण करण्यास सांगितले होते.
मात्र, तत्कालीन सरकारने गुजराल यांच्या सल्ल्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही’ असे विधान केले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तसेच आमच्या दोघांचा प्रवास सारखाच आहे कारण आम्ही दोघे पाकिस्तानमध्ये जन्मलो आणि दोघेही देशाचे पंतप्रधान झालो असेही ते यावेळी म्हणाले.