औरंगाबाद – कोरोना लसीकरण वाढविण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना करत आहे. अशातच लसीचा एकही डोस न घेणाऱ्या रिक्षाचालकांवर सोमवारपासून दंडासह वाहन जप्तीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहेत. तसेच लसीचा किमान एक डोस घेणाऱ्यांनाच खासगी बस चालकांनी तिकीट घ्यावे असे आदेश काढण्यात आले आहेत.
कोरोना लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन दिवसागणिक नवनवीन आदेश काढत आहे. काल सायंकाळी रिक्षा आणि खाजगी बस चालकांसाठी प्रशासनाने नवीन आदेश काढला. या आदेशानुसार लसीची एकही मात्रा न घेतलेल्या रिक्षाचालकांवर सोमवार सकाळी दहा वाजेपासून दंडात्मक तसेच वाहन जप्तीची कारवाई होणार आहे. प्रशासनाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे लसीकरण केंद्रांवर रांगा दिसू लागल्या आहेत.
लस घेतली तरच मिळणार बसचे तिकीट –
खासगी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील लसीचा पहिला डोस घेतला असेल तरच तिकीट मिळणार आहे. मोबाईल क्रमांकावर लसीची खातरजमा करावी खासगी बसचे चालक वाहक यांनी लस घेतली का याची पडताळणी करावी. लसीचा किमान एक मात्रा घेतली नसेल, तर वाहनांवर दंडात्मक कारवाई करून वाहन जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आरटीओला दिले आहेत.