हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 2017 साली शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू करण्यात आली होती. परंतु अजूनही राज्यातील 6 लाख 56 हजार शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. तसेच, अद्याप या सर्व शेतकऱ्यांना 5 हजार 975 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळालेली नाही. त्यामुळे एकीकडे राज्यात दिवाळी साजरी होत असताना दुसरीकडे शेतकरी कर्जाच्या भारामुळे हताश झाला आहे.
कर्जमाफीचे पोर्टलच बंद
2017 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू करण्यात आली होती. त्यावेळी राज्यातील 44 लाख 4 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला होता. राज्य सरकारने तेव्हा या शेतकऱ्यांच्या 18 हजार 762 कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. परंतु 2019 साली सरकार बदलल्यामुळे कर्जमाफीचे हे पोर्टलच बंद पडले. त्यामुळे तेव्हापासून लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. आता हे सर्व शेतकरी नव्या सरकारकडे कर्जमाफीसाठी आस लावून बसले आहेत.
दरम्यान, या योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत सर्व कर्ज माफ करणे, 25 हजार रुपये प्रोत्साहन, दीड लाखांवरील कर्जात सवलत देणे अशा तीन प्रमूख प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांनी आणलेली ही योजना 50 लाख 60 हजार पात्र शेतकऱ्यांना 24 हजार 737 कोटी रुपयांची कर्जमाफी देणारी होती. मात्र आता या योजनेची दारे शेतकऱ्यांसाठी बंद झाली आहेत. त्यामुळे ही योजना शिंदे – फडणवीस सरकारने पुन्हा सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.