पाटण | मणदुरे (ता. पाटण) येथे रानगव्यांनी हाैदाैस मांडला आहे. पावसाळ्यात पाटण तालुक्यात भात शेतीचे पीक अनेक शेतकऱ्यांनी घेतले आहे. मात्र, रान गव्यांनी 60 ते 70 एकरातील भात पिकांचे तरूचे नुकसान केले आहे. अशावेळी वनविभाग वन्यप्राण्यांचा बंदोबस्तही करू शकत नाही आणि पिकांचे नुकसानही देणार नाही असे, सांगत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
पाटण तालुक्यात पावसाचे प्रमाण दरवर्षी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे डोंगर- दऱ्यातील शेतकरी भात पिकाचे उत्पादन घेत असतो. परंतु या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मणदुरे परिसरात डोंगरात रानगवे, डुक्कर यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. सध्या सुमारे 15 ते 20 शेतकऱ्यांचे 60 ते 70 एकर भात शेती तरूचे (रोपे) रान गव्यानी नुकसान केले आहे. त्यामुळे ऐन भात लागवड लावणीच्या हंगामात आलेले भात पिकाचे तरू रान गव्यानी खाल्ल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
वनविभाग हतबल, शेतकरी चिंताग्रस्त
आम्ही वनविभाग गेलो होतो. आमच्या शेतात भात पिक हे उत्पन्न साधन आहे. तरी वनप्राण्याचा बंदोबस्त करावा. तसेच आमच्या भात रोपांचे नुकसान पाहून पंचनामा करून आम्हांला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. परंतु रोपांना कोणत्याही प्रकारची भरपाई मिळत नाही, तसेच वनप्राण्यांचाही बंदोबस्त होत नाही. अशी उत्तरे वनविभागाकडून मिळत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांनी काय करायचे असा प्रश्न मणदुरे विभागातील शेतकऱ्याच्यांपुढे उभा असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.