हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | घरात फटाके टाकल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका युवकावर भर चौकात कोयत्याने खुनी हल्ला केल्याने कराड शहरात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात ओम गणेश बामणे (रा. शिंदे गल्ली) हा युवक जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणी हल्लेखोरांमधील एका संशयितास पोलिसांनी धाडसाने त्याच्याकडील कोयत्यासह ताब्यात घेतले आहे. अन्य संशयितांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की. कराड येथील दत्त चौकात बंदोबस्तावर असणाऱ्या दोन पोलिसांनी एका संशयिताला घटनास्थळीच पकडले. तर दोन जण पळून गेले. जीवे मारण्याची दिली होती धमकी शिंदे गल्लीतील ओम गणेश बामणे याच्या घरात संशयितांनी दिवाळी दिवशी फटाके टाकले होते. त्याचा जाब विचारल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यावेळी तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी संशयितांनी ओम याला दिली होती. त्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या होत्या.
त्यावरून पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. पाठलाग करून हल्ला प्रतिबंधक कारवाईनंतर पोलिसांनी त्यांना आज तहसीलदारांसमोर हजर केले होते. कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सर्वजण कचेरीतून बाहेर पडले. त्याचवेळी त्याचा काही तरूणांनी पाठलाग सुरू केला. त्यामुळे तो दत्त चौकाकडे पळत सुटला. चौकात गाठून संशयितांनी त्याच्यावर खुनी हल्ला चढवला. कोयत्याचा एक वार डाव्या हातावर आणि दुसरा वार डाव्या डोळ्याच्या वरच्या बाजूला लागला.
पोलिसांनी एकाला जाग्यावरच पकडले दिवाळीमुळे शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे. कोयत्याने हल्ला झाला त्यावेळी आरएसपी जवान सतीश केराप्पा शेंडगे आणि अनिकेत यशवंत बनकर हे बंदोबस्तावर होते. त्यांनी एका संशयिताला जाग्यावरच पकडले, तर अन्य दोघे पळून गेले. पोलीस आणि नागरिकांनी जखमी युवकाला रूग्णालयात दाखल केले.