खंडाळा | खंडाळा साखर कारखाना उभा राहिला पाहिजे, शेतकरी हितासाठी तो पूर्ण क्षमतेनं चालला पाहिजे ही आमची भूमिका आहे. म्हणून कधी कारखान्याला विरोध केला नाही. परंतु आता कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागलं असल्याचे वक्तव्य आमदार मकरंद पाटील यांनी केले.
शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या भादे गटातील प्रचारात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, नितीन भरगुडे, विश्वनाथ पवार, दत्तानाना ढमाळ, सभापती राजेंद्र तांबे, जिल्हा पंचायत सदस्य मनोज पवार, दीपाली साळुंखे, काँग्रेस तालुकाध्यक्ष एस. वाय. पवार, रमेश धायगुडे, विनोद क्षीरसागर, डॉ. नितीन सावंत, चद्रकांत ढमाळ, शंकरराव क्षीरसागर, शिवाजीराव शेळके, हणमंतराव साळुंखे, धनाजी अहिरेकर, किसनराव ननावरे, सुरेश रासकर, विजय धायगुडे यासह परिवर्तन पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते.
सत्ताधारी पक्षाला कारखाना व्यवस्थापन चालविण्यात सातत्याने येत असलेले अपयश येत असल्याने परिवर्तन पॅनेलला साथ दिली. संस्थापक पॅनेलच्या आडमुठ्या धोरणामुळेच कारखान्याची निवडणूक शेतकरी सभासद वर्गावर लादली गेली असल्याचा आरोप उपाध्यक्ष पवार यांनी केला.
पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करून निवडणूकबाबत भूमिका
कॉंग्रेसने खंडाळा कारखाना निवडणुकीत घेतलेली भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करुन घेतलेली आहे, त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी अपप्रचाराला बळी पडू नये, असे तालुका कॉंग्रेस अध्यक्ष पवार यांनी स्पष्ट केले.