हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक साह्य करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Mahasamman Fund Scheme) सुरू केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेतून मिळणाऱ्या वार्षिक 6000 च्या मदतीव्यतिरिक्त, राज्य सरकारही तितकीच रक्कम देत आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सध्या एकूण 12,000 वार्षिक मदत मिळत आहे.
महत्वाचे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी या योजनेतील मदतीत 3000 ची वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना वार्षिक 15,000 अनुदान मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासन्मान निधीतील वाढीबाबत सरकार घोषणा करेल का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांना किती मदत मिळाली?
राज्य सरकारने सन 2023-24 पासून ही योजना राबवायला सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यातील 91.45 लाख शेतकऱ्यांना एकूण 9055.83 कोटी निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. याचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये वर्ग करण्यात आला होता.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
केंद्र सरकारने अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी 2018-19 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) सुरू केली. या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबांना 6000 वार्षिक मदत तीन हप्त्यांमध्ये मिळते. योजना सुरू झाल्यापासून ऑक्टोबर 2024 पर्यंत महाराष्ट्रातील 117.55 लाख शेतकऱ्यांना एकूण 33,468.55 कोटी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.
त्याचबरोबर, पीएम-किसान योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना एकूण 19 हप्त्यांचे 38,000 मिळाले आहेत. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या मदतीने शेतकऱ्यांना सध्या मोठा आर्थिक आधार मिळत आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक शेतकरी अवकाळी पावसामुळे आणि शेतीवरील वाढत्या खर्चामुळे आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत नमो शेतकरी महासन्मान निधीमध्ये वाढ झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. आता ही वाढ आजच्या अर्थसंकल्पात जाहीर होते का? याकडे संपूर्ण कृषी क्षेत्राचे लक्ष लागले आहे.